Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 12:49 PM

अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.

मुंबई - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला आहे त्यामुळे अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन भाजपाची फिरकी घेतली आहे. 

अयोध्येत राम मंदिर तर महाराष्ट्रात सरकार, जय श्री राम असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे राम मंदिराच्या मुद्द्यावरुन गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने अनेक कार्यक्रम हाती घेतले होते. स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला गेले होते. त्याठिकाणी शिवसेनेकडून शरयु नदीच्या किनारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पहले मंदिर फिर सरकार अशा आशयाचे बॅनर्स लागले होते. त्यावेळी या मजकूराची चर्चा सगळीकडे सुरु होती. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपाने युती करुन निवडणूक लढविली होती. त्यावेळी राम मंदिराच्या या बॅनर्सवरुन अनेकांची त्यांची खिल्ली उडविली होती. मात्र राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे आणि इतके वर्ष रखडलेल्या अयोध्या प्रकरणाच्या निकालामुळे शिवसेनेने ही योग्य वेळ साधत अयोध्येत राम मंदिर आणि महाराष्ट्रात सरकार अशी प्रतिक्रिया दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

अयोध्येतील एका प्रकरणावर बाळासाहेबांवरही खटला चालला, गुन्हा दाखल झाला. गेल्या वर्षभरापासून मंदिराच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. हे आंदोलन एका पक्षाचे नव्हते, यामध्ये सर्वपक्षाचे लोक होते. राम मंदिराचा अध्यादेश आणावा अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची वाट बघा असं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज निर्णय झाला, तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा. हा निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे, सरकारचा नाही असा टोलाही शिवसेनेचे संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपाराम मंदिरअयोध्यासर्वोच्च न्यायालय