Join us  

Maharashtra Government: सोनिया गांधी-पवारांची भेट होणार; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान नवं सरकार येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 8:50 AM

राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येत सत्तास्थापनेची वाटचाल करत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याची चिन्हं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीत अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी १६ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. तसेच १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित येत सत्तास्थापनेची वाटचाल करत आहे. मुख्यमंत्रिपदावरुन अडून असलेली शिवसेना आघाडीच्या सहाय्याने राज्यात मुख्यमंत्री बनविणार आहे. ज्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना भाजपापासून वेगळी झाली. त्याचा स्वाभिमान आणि सन्मान राखला जाईल ही जबाबदारी आमची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा हे या महाशिवआघाडीच्या किमान समान कार्यक्रमात ठरलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी तीन नावं मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. 

गुरुवारी रात्री काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई बैठकीला हजर होते.

बैठकीनंतर या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भूमिका मांडली. राज्यातील शेतकरी संकटात आहे. यामुळे त्याच्या भल्यासाठी निती ठरविण्यात येत आहे. राज्याला पुन्हा निवडणुका नकोत. त्याचा भार जनतेवर नको म्हणून आम्ही एकत्र येत असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुरुवारी पहिली समन्वय बैठक झाली. महाशिवआघाडीच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. लवकरच हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

टॅग्स :शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसोनिया गांधीकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019