Join us  

Maharashtra Government: रिपब्लिकन पदाधिकाऱ्याचं संजय राऊत यांना खुलं पत्र; आठवलेंवरील टीकेचा घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 5:56 PM

आठवलेंवरील या टीकेनंतर रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी संजय राऊत यांना खुलं पत्र लिहिलं आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा आणि शिवसेनेत तणाव वाढला आहे. शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे सत्तास्थापनेसाठी भाजपाही हतबल झाली त्यामुळे भाजपाचे मित्रपक्ष असलेले रामदास आठवलेंनी या दोन्ही पक्षातील तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न केले. 

दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांची रामदास आठवलेंनी भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी शिवसेनेला नवा फॉर्म्युला देत ३ वर्ष भाजपाचा आणि २ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असा प्रस्ताव ठेवला मात्र त्यावर राऊत यांनी जर भाजपाला यावर सहमत असेल तर शिवसेना विचार करेल असं उत्तर दिलं. यावर रामदास आठवलेंनी भाजपा नेत्यांशी बोलण्याचं मान्य केलं. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी रामदास आठवलेंना टोला लगावला. 

यावर संजय राऊत म्हणाले की, रामदास आठवलेंकडून हेच ऐकायचं बाकी होतं. रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. 

आठवलेंवरील या टीकेनंतर रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी संजय राऊत यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यात ते म्हणतात की...

प्रति संजय राऊत शिवसेना प्रवक्ते जय भीम !जय महाराष्ट्र !

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा जनकल्याणाचा बाणा समजून घ्यायला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना स्वार्थाचा  आणि सत्तालोलुपतेचा चष्मा काढावा लागेल. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना शिवसेनेची किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची काळजी नाही. त्यांना काळजी वाटते ते कष्टकरी श्रमिकांच्या; ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची.  राज्यातील जनतेच्या हिताची काळजी आहे.महाराष्ट्राची काळजी आहे. त्यासाठी महाराष्ट्रात लवकर राज्य सरकार स्थापन व्हावं याचीच काळजी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना आहे. राहिला विषय अधिकार वाढवून घेण्याचा तर संजय राऊत तुम्ही हे मन लावून ऐका..की या देशात प्रत्येकाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे अधिकार दिलेत. जनकल्याणासाठी संविधानाने  दिलेले अधिकार पुरेसे आहेत. रामदास आठवले नावाचा योद्धा संविधानकारांचा भीमसैनिक आहे. या योद्धयाला मंत्रिपदाच्या किंवा कुठल्याही इतर अधिकार वाढवून मागण्याची अन्य कुबड्यांची गरज पडत नाही. 

तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला सम्यक मार्ग म्हणजे मध्यममार्ग हाच योग्य मार्ग आहे. त्यानुसार अनेक अडचणींवर मात करण्यासाठी सुवर्णमध्य साधण्याचे काम रामदास आठवले लीलया पेलतात. त्यामुळेच महाराष्ट्रात जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान होऊ नये; राज्यात नवीन सरकार लवकर स्थापन होऊन जनतेच्या अडचणी सुटाव्यात यासाठी मध्यममार्ग म्हणून शिवसेना भाजपला एकत्र आणण्याचा सुवर्णमध्य साधण्याचे प्रयत्न रामदास आठवले यांनी केला. महाराष्ट्राच्या 11 कोटी  जनतेचीही तीच इच्छा असल्यामुळे रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या मनातील इच्छा संजय राऊत यांना सांगून शिवसेना भाजपला एकत्र आणून सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयत्न महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आवडला आहे. संजय राऊत तुम्ही हवेत राहून उतू नका आणि मातु नका या  महाराष्ट्राच्या मातीने भले त्याला देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाचे माथी हाणू काठी हे तत्व पाळीत अनेकांचे गर्वहरण केले आहे. भाजपवाले जमिनीवर आलेत शिवसेनेनेही जमिनीवर यावे. जात्यात आज भाजपा आहे म्हणून सुपातील शिवसेनेने हसू नये. उद्या शिवसेनेची वेळ जात्यात जाण्याची येणार आहे. त्यापूर्वी सावध व्हा. जनतेचा आदेश माना. नाहीतर अति तिथे माती या निसर्ग नियमाला शिवसेनेला ही सामोरे जावे लागेल किंवा संजय राऊत सारख्यांना सुट्टी देऊन सख्तीचे मौनव्रत पाळायला लावण्याचा निर्णय शिवसेनेला घ्यावा लागेल.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपारामदास आठवलेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019