Join us  

Maharashtra Government: अजित पवारांकडून नारायण राणेंना खुलं चॅलेंज; एकही आमदार जर फुटला तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:18 AM

बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे ३ दिवसांची मुदत मागितली होती त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठविली. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला. अशातच भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले आहे. त्यामुळे भाजपा सत्तासंघर्षात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. 

बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे. मात्र यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं आहे. 

तसेच आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे.विधानसभा अस्तित्वात आली नसली तरी आमदार म्हणून लोकांमधून निवडून आलेत. ते लोकांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेणार आहेत. अहमद पटेल, शरद पवार या सर्वोच्च नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ११ तारखेपासून अधिकृत बोलणी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंनी रामविलास पासवान, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जम्मू काश्मीरचं उदाहरण दिलं. राज्यातील जनतेने असा कौल दिला आहे की, कोणताही एक पक्ष सत्ता स्थापन करु शकत नाही. १४५ आकडा गाठण्यासाठी मदत घ्यावीच लागणार आहे असंही अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, राजीनामा देऊन जे निवडणुकीला सामोरे गेले त्यांचे काय झालं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन आसमानचा फरक आहे. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी सुरु आहे. पुढे सरकार कसं चालवायचं, कोणाची काय जबाबदारी असेल हे सगळं ठरवावं लागत आहे. त्यामुळे चर्चा सुरु आहे असं अजित पवारांनी सांगितले.  

टॅग्स :अजित पवारनारायण राणे शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस