Join us  

Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 6:39 PM

Maharashtra News : तसेच शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अन् राज्याचा कारभार राज्यपालांच्या हाती गेला आहे. उद्या महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी मनसे नेते राजू पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. 

उद्या सकाळी ११.३० च्या दरम्यान राजभवन येथे मनसेचे नेते जातील. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पीकाचे नुकसान झाले आहे. अशातच राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय स्थितीमुळे सरकार कोणाचं येईल याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 

यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षासाठी मतदान करा असं आवाहन लोकांना केलं होतं. मात्र या निवडणुकीतही मनसेचा एकमेव आमदार निवडून आला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेत.

दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या क्यार व महा चक्रिवादळामुळे तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शेतीपिकासाठी प्रती हेक्टर 8 हजार आणि फळबागासाठी 18 हजार, दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतची आर्थिक मदत राज्यपालांकडून जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय जमीन महसुलात सूट आणि शेतीपिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे.

तसेच शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा झालेल्या रक्कमेतून बॅंकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेश संबंधित बँकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे. मात्र राज्यपालांनी दिलेली मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज असल्याचं विरोधकांचे म्हणणं आहे.  

टॅग्स :मनसेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र सरकारराज ठाकरे