Join us  

Maharashtra Government: महाशिवआघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार; तत्पूर्वी फडणवीसांनी घेतली भेट   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 1:02 PM

राज्यात ओला दुष्काळ आला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.

याबाबत नवाब मलिक यांनी सांगितले की, राज्यात ओला दुष्काळ आला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राष्ट्रपती राजवट सुरु असल्याने राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी उद्या दुपारी ३ वाजता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाचे नेते राज्यपालांना भेटायला राजभवनावर जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली. यावर राज्यपालांनी सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली. 

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी आमदार बच्च कडू यांच्या नेतृत्वात राजभवनावर जाणा-या शेतकऱ्यांच्या मोर्चास पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडविले होते. प्रहार जनशक्ती संघटनेने काढलेला शेतकऱ्यांचा हा मोर्चा आझाद मैदानातून राजभवनवर पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी कडू यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यावेळी सांगून आलो होतो, यापुढे न सांगता राजभवनवर धडकणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाकाँग्रेसशेतकरी