Join us  

Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:06 PM

महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपा महायुतीला जनतेने कौल दिला मात्र मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाला. त्यामुळे विधानसभा निकाल १८ दिवस उलटले तरी राज्यात अद्यापही कोणत्याच पक्षाचं सरकार आलं नाही. त्यामुळे राज्यपालांच्या शिफारशीवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागते हे अतिशय चिंताजनक आहे असं मत खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी मांडले आहे. 

याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले की, आज स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडवर होतो, आणि आत्ताच माझ्याकडे बातमी आली की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटातून जातोय, अनेक कारणांमुळे युवक नैराश्यात आहेत, अनेक प्रश्न राज्यसमोर आ वासून उभे असताना, ही राजकीय अस्थिरता परवडणारी नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच हा सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढावा. व स्थिर सरकार स्थापन करुन लोकाभिमुख राज्यकारभार करावा असा पर्याय छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. त्यामुळे या एकंदर राज्याच्या घडणाऱ्या घडामोडीवर संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचं निमंत्रण दिलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे ३ दिवसांची मुदत मागितली होती त्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठविली. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला. अशातच भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामाला लागण्याचं सांगितले आहे. त्यामुळे भाजपाही सत्तासंघर्षात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असं महाशिवआघाडीचं सरकार येणार की पुन्हा भाजपा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षातील आमदार गळाला लावणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस