Join us  

Maharashtra CM:सत्तेचा फॉर्म्युला; शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 6:46 AM

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, समान कार्यक्रम व सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, समान कार्यक्रम व सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्रिपद शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावी, या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे कळते.काँग्रेसचे नेते अहमद पटेल व उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी तासभर चर्चा झाली. शिवसेनेने स्वत:साठी मुख्यमंत्रिपद व दोन्ही काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला तिथे सुचविला. मात्र, त्याला राष्ट्रवादी तयार नसल्याने समजते. शिवसेना व राष्ट्रवादीत दोन जागांचे अंतर असल्याने राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्रिपद हवे आहे. आधीची अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसनी दिल्याचे कळते. शिवसेनेने त्यास प्रतिसाद दिलेला नाही. ठाकरे-पटेल यांच्या चर्चेत अंतिम निर्णय झाला नाही. उद्धव पक्ष नेत्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहेत.काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंचतारांकित हॉटेलात बैठक झाली. मात्र, बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली.>अजितदादांचा माध्यमांना गुंगारा!प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ‘बैठक रद्द झाली, मी बारामतीला जात आहे’ अशी लोणकढी थाप मारून अजित पवार थेट दोन्ही काँग्रेसच्या बैठकीला रवाना झाले. मात्र, या बैठकीचा थांगपत्ता नसल्याने वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर ‘अजित पवार नाराज’ अशी बातमी झळकली. माध्यमांच्या या अतिघाईवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019अजित पवारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस