Maharashtra Election 2019 : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी का करता? , स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 00:21 IST2019-10-12T00:21:16+5:302019-10-12T00:21:50+5:30
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत इराणी यांनी भाजप सरकारच्या विकास कामांचा उल्लेख केला.

Maharashtra Election 2019 : स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी का करता? , स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचा सवाल
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला येण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने वीर सावरकर यांचा अपमान का केला, याचे उत्तर द्यायला हवे. याशिवाय, काश्मीर मुद्द्यावर ब्रिटनच्या ज्या राजकीय पक्षाने आणि नेत्यांनी भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस नेते का काम करत आहेत, असा प्रश्न केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी केला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत इराणी यांनी भाजप सरकारच्या विकास कामांचा उल्लेख केला. यावेळी राहुल गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इराणी म्हणाल्या की, आज राहुल गांधी त्यांच्या पक्षासाठीच एक समस्या बनले आहेत. महाराष्ट्रातील प्रचाराला येण्यापूर्वी सातत्याने वीर सावरकरांची बदनामी का करतात, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यायला हवे. याशिवाय, भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या ब्रिटिश पक्ष आणि नेत्यांसोबत काँग्रेसवाले का काम करत आहेत, याचाही खुलासा राहुल यांनी करायला हवा, असेही इराणी म्हणाल्या.
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने विकास आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून इराणी म्हणाल्या की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी केवळ ७,५०० कोटींची नुकसान भरपाई मिळाली. फडणवीस सरकारच्या काळात मात्र शेतकºयांना २१ हजार ९५० कोटी एवढी भरपाई पीक विम्यापोटी मिळाली. आघाडी सरकारने केवळ चार हजार कोटींची कर्जमाफी केली, तर फडणवीस सरकारने २५ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पाच वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात दीड लाख कोटी गुंतवणूक करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात पाच वर्षांत एकही दंगल झाली नाही, एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, असे इराणी म्हणाल्या.