Join us

Video: माणसं अहंकारानं वागतात तेव्हा मला 'ही' कव्वाली आठवते; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 08:50 IST

अल्पमतात भाजपा सत्तेत दावा करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. मुख्यमंत्रिपदावर कोणत्याही प्रकारे तडजोड करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. तर लोकसभेला ठरल्याप्रमाणेच करा, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं ही आग्रही मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. त्यामुळे निकाल लागून १५ दिवस उलटले तरी राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. 

शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे पक्षाची आक्रमक भूमिका रोजच्या रोज माध्यमासमोर मांडत आहे. दररोज सकाळी एका शायरीच्या माध्यमातून संजय राऊतभाजपावर निशाणा साधत आहे. तर गुरुवारी रात्री संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अझीज भाईची लोकप्रिय कव्वाली पोस्ट करत अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे. 

संजय राऊत यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, लोक उगाच अहंकार आणि गर्वाने वागतात तेव्हा मला अझीज भाईची ही कव्वाली आठवते, जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पायेगा सरको उठाकर चलनेवाले एक दिन ठोकर खायेगा चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा अशा या कव्वालीच्या माध्यमातून भाजपाला अहंकार आणि गर्व चढला आहे अशी अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची गुरुवारी मातोश्री निवासस्थानी बैठक घेतली. यात आमदारांची मते उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली. यामध्ये मी स्वत:हून युती तोडणार नाही, मला जे ठरलं होतं ते द्या, किंचितच जास्त काही मागत नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलं होतं तेच मी मागतोय अशी भूमिका आमदारांसमोर मांडली होती. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या बैठकीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी अपेक्षा धरणाऱ्या भाजपाचा हिरमोड झाला. 

अल्पमतात भाजपा सत्तेत दावा करणार नाही अशी भूमिका भाजपाच्या नेत्यांनी घेतली आहे. तर महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्यामुळे जनादेशाचा आदर शिवसेनेने ठेवावा अशी अपेक्षा भाजपाला आहे. मात्र मुख्यमंत्रिपद भाजपा सोडणार नाही. देवेंद्र फडणवीसच शिवसैनिक आहेत असं समजा, फडणवीसांच्या रुपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा शब्दांचा खेळ भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार करत आहेत. तर संजय राऊत यांनी मलाच अमित शहा समजा अशा शब्दात भाजपाला टोला लगावला होता.   

टॅग्स :संजय राऊतभाजपाशिवसेना