Join us  

उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 2:41 PM

घाटकोपर पश्चिम विधानसभा 2019 - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत

मुंबई -  विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या युतीमुळे काही ठिकाणी शिवसैनिक नाराज असल्याचं दिसून येत आहे. शहरातील घाटकोपर पश्चिम येथे स्थानिक शिवसैनिकांनी युतीचे उमेदवार राम कदम यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. घाटकोपरमध्ये शिवसेनेचा उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसैनिकांची होती. मात्र युती झाल्याने हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आला त्यानंतर या मतदारसंघात राम कदम यांना पक्षाने पुन्हा संधी दिली. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत. घाटकोपर पश्चिम भागात हे पोस्टर्स झळकले पाहायला मिळत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना खुल पत्र लिहिलं आहे. यामध्ये आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला असं नमूद करण्यात आलं आहे. 

या पोस्टर्समध्ये लिहिण्यात आलं आहे की, किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला युतीची उमेदवारी मिळू दिली नाही तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला. आणि महिलांचा अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नका अशी आपली ठाम भूमिका होती. पण आज भाजपाने युतीची उमेदवारी राम कदम यांना दिली. त्यामुळे साहेब माफ करा, यावेळी भाजपाला मतदान नाही आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला, आपला घाटकोपरचा कट्टर शिवसैनिक अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. 

दहिहंडीच्या कार्यक्रमात आमदार राम कदम यांनी मुलींबाबत वक्तव्य करताना म्हणाले होते की, ‘मला लोकं म्हणतात, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती नाही म्हणतेय, मला मदत करा. चुकीचं आहे. १००% मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई-वडिल जर म्हणाले की साहेब आम्हाला ही मुलगी पसंत आहे, तर आम्ही तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार.या त्यांच्या वक्तव्याने गदारोळ माजला होता. अनेकांनी राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राम कदम यांची डोकेदुखी वाढणार आहे.  

टॅग्स :मनसेशिवसेनाभाजपाराम कदमउद्धव ठाकरेघाटकोपर पश्चिम