Join us  

...म्हणून भाजपाने सरकार बनविण्यात असमर्थता दाखविली; अमित शहांच्या बैठकीत काय घडलं होतं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 7:57 AM

महाराष्ट्रात सरकार स्थापन न करण्याचा धडा भाजपाने कर्नाटकपासून घेतला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. राज्यात सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळून सुद्धा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने सरकार बनविण्यात असमर्थता दर्शविली होती. राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपाच्या कोअर कमिटीत चर्चा झाली त्यात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर भाजपा राज्यात सत्तास्थापन करु शकत नाही असं स्पष्ट केलं. 

भाजपाने एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्ष कोणत्याही राज्यात सरकार बनविण्याची संधी लवकर सोडत नाही. त्यात महाराष्ट्रासारखं मोठं राज्य, ज्याठिकाणी देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र राज्यात भाजपा सत्तास्थापनेपासून दूर राहिली यामागे निश्चितच दूरदृष्टीचा निर्णय आहे जो योग्य होता ते लवकर समोर येईल. 

विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपा यांनी एकत्र येत सत्तेसाठी जनतेला मतं मागविली होती. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी अडून राहिली. शिवसेनेची ही मागणी भाजपाने मान्य केली नाही. त्यानंतर राज्यपालांकडून निमंत्रण आल्यानंतरही भाजपाने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखविली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी संधी दिली. 

शिवसेनेला राज्यपालांनी २४ तासांची मुदत दिली. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना नेतृत्वाला कसरत करावी लागली. शरद पवारांची भेट, सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुनही मुदत संपली तरीही दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली. या सर्व घडामोडीत शिवसेनेची नाचक्की झाली. त्यामुळे युती तोडण्याचा ठपका भाजपाच्या माथी लागला नाही. त्यामुळे या संपूर्ण नाट्याचा प्रचार भाजपा राज्यभर करणार आहे. 

त्याचसोबत जर शिवसेना-महाआघाडीच्या मदतीने सरकार बनवित असेल तर शिवसेनेचा या दोन्ही पक्षांशी राजकीय अन् विचारांचे वैर आहे. शिवसेनेची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाआघाडीला या मुद्द्यावरुन घेरण्याची भाजपाची तयारी आहे. भाजपा कलम ३७०, तिहेरी तलाक आणि देशात समान नागरिक कायदा अशा मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडणार असल्याची चर्चा आहे. 

कर्नाटकचा धडामहाराष्ट्रात सरकार स्थापन न करण्याचा धडा भाजपाने कर्नाटकपासून घेतला आहे. २०१८ मध्ये कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून येदियुरप्पा यांनी सरकार स्थापन केले. मात्र विधानसभेत बहुमत सिद्ध न करु शकल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. भाजपाने महाराष्ट्रात तशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली. 

शिवसेनेची पोलखोलशिवसेनेचा आक्रमक पवित्रा पाहता सत्तेपासून दुरावलेली भाजपा पुन्हा जनतेच्या समोर जाण्याची तयारी करत आहे. भाजपाच्या नेत्याने सांगितले की, आम्ही पुन्हा जनतेसमोर जाऊन शिवसेनेने जनादेशाचे अपमान केला हे सांगणार आहोत. तसेच सत्तेत सहभागी असतानाही विकासकामांमध्ये कशाप्रकारे शिवसेनेने आडकाठी भूमिका घेतली याचा प्रचार करणार असं सांगितले. 

टॅग्स :शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसभाजपा