Join us  

महाराष्ट्र निवडणूक 2019: मध्यावधी निवडणूक टाळण्यासाठी आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 5:26 AM

राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणे कोणालाही परवडणारे नाही.

मुंबई : राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणे कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होऊ न देता राज्यात समान कार्यक्रमावर आधारित सरकार बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार्यातून सरकार बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांच्या बैठकीत मांडली.राष्टÑवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची तसेच जेष्ठ नेत्यांची बैठक वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झाली. राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागेल अशी भीती आमदारांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तोच धागा पकडत खा. पवार म्हणाले, पुन्हा निवडणुका होतील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी ती तात्पुरती असते. ज्या वेळी तीन पक्षांमध्ये पूर्ण सहमती होईल आणि तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांना जाऊन सरकार स्थापनेचा दावा करतील, त्यावेळी राष्ट्रपती राजवट संपुष्टात येईल.>आपल्याला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. आपण विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केली आहे, मात्र भाजपने सरकार बनवण्यात असहमती दर्शवली आहे. त्यामुळे प्राप्त राजकीय परिस्थितीत आपण निवडणुकांना सामोरे न जाता राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यात निश्चितपणे आपण पुढे जाऊ असेही पवार यांनी आमदारांना सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा