Join us  

...म्हणून शिवसेनेला पत्र देण्यास अडचण आली; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:11 AM

सोमवारी रात्री उशीरा राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. शिवसेनेला दोन्ही काँग्रेसचं पाठिंब्याचं पत्र मुदतीत मिळालं नसल्याने शिवसेनेची कोंडी झाली. मात्र एकट्या राष्ट्रवादीनं पत्र देऊन काहीही झालं नसतं, आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहत होतो. रात्री उशीरापर्यंत निर्णय झाला नाही. काँग्रेसचे आमदार जयपूरला, नेते दिल्लीला त्यामुळे या प्रक्रियेला विलंब झाला असल्याचं राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. 

सोमवारी रात्री उशीरा राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. आज रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला राज्यपालांना उत्तर देण्यासाठी मुदत आहे. यावर अजित पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र मिळून निर्णय घेतला तर त्यातून काही मार्ग निघेल. जयपूरहून काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले. आज ते महाराष्ट्रात येतील त्यानंतर त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढल्या आहेत दोघं मिळून निर्णय घेण्याची गरज आहे. शिवसेना-भाजपाचं बिनसलं म्हणून शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. राज्यपालांनी २४ तासाचा वेळ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दुपारी २ वाजता बैठक आहे, आम्ही निर्णय घेऊ, काँग्रेसनेही निर्णय घ्यायला हवा. शिवसेनेसोबत चर्चा करण्याची भूमिका दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन ठरवेल. राष्ट्रपती राजवट लागू झाली किंवा नाही आमच्याकडे बहुमत १४५ पेक्षा जास्त असेल तर सगळं सुरळीत होईल. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला हवा. सत्तेत कसा वाटा असणार? स्थिर सरकार द्यायचं असेल तिन्ही पक्षांची एकवाक्यता व्हायला हवी असं अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, काँग्रेससोबत आली तर निर्णय होऊ शकतो. काँग्रेस-राष्ट्रवादीने यापूर्वी एकत्र सरकार चालविलं आहे. आमच्यात एकमेकांशी बोलून अडचणी सोडवू शकतो. पण शिवसेनेसोबत आम्ही कधी सरकार चालविलं नाही म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात आहे. किमान समान कार्यक्रम ठरवावा लागेल. शेवटी आम्हाला जनतेला, मतदारांना उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे आज पुन्हा चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत एकवाक्यता झाली तर पुढील चर्चा होईल असंही अजित पवारांनी बोलून दाखविले.    

टॅग्स :अजित पवारकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना