Join us  

शिवसेनेला 'पॉवरफुल्ल' धक्का?; संजय राऊतच म्हणाले, 'शरद पवार विरोधात बसण्यावर ठाम!'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 11:30 AM

राज्यातील अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेवर जोरदार हालचाली सुरु आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली आहे. जवळपास १० मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती असं संजय राऊत यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांवर राज्यातील स्थितीवर चर्चा झाली. राज्यातील अस्थिर स्थितीवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी असं शरद पवारांना वाटतं. त्यांचे ठाम मत आहे की, राष्ट्रवादी-काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्याचं जनतेने कौल दिला आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

या भेटीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी ते म्हणाले होते की, , काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा ही जनतेची मागणी आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जिथे जातील तिथे लोकं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा हेच मागणी करत आहे. शेतकरी आशेने बघत आहे. तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही त्यांनी सांगितले होते. 

सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याचं समजतं. त्यामुळे राऊत-शरद पवार यांच्या भेटीत पवारांनी विरोधी पक्षात बसण्याचं व्यक्त केलेले मतं शिवसेनेच्या प्रयत्नांना ब्रेक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

तत्पूर्वी बुधवारी सकाळी काँग्रेसचे अहमद पटेल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यात ३० मिनिटे बैठक झाली. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य मानले जातात. तर नितीन गडकरी महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या भेटीत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. पण या भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :संजय राऊतशरद पवारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस