Join us
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे मातोश्रीवरून आल्यापावली माघारी, मध्यस्थी अपयशी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 22:56 IST

मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली आहे.

मुंबई - मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने महायुतीमध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये तणावाचे वातावरण असतानाचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजी यांनी आज अचानक मातोश्रीवर धाव घेतली. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर उपस्थित नसल्याने संभाजी भिडे गुरुजी यांना मातोश्रीवरून आल्यापावली माघारी निघावे लागले. त्यामुळे युतीमध्ये पुन्हा संवाद प्रस्थापित करण्यासाठी संभाजी भिडे गुरुजींनी केलेली मध्यस्थीही अपयशी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सगळ्या आमदारांनी एकमुखानं उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सगळ्यांनाच मान्य असेल. महाराष्ट्रात जी अस्थिरता निर्माण होताना दिसतेय, ती अस्थिरता त्यांच्यामुळे निर्माण होतेय. महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाच्या आमदारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका घेतलेली आहे. 24 तारखेला निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची हीच भूमिका होती, ती आतासुद्धा आहे. मी माझ्याकडून युती तुटेल असं काहीही करणार नाही. युती तोडण्याचं पाप मी करणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी पुन्हा एकदा आपली भूमिका आमदारांच्या समोर मांडली. सर्वच आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन दिलं. शिवसेनेच्या आमदारांना कुठेही दुसरीकडे हलवलेलं नाही. आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. 

टॅग्स :संभाजी भिडे गुरुजीउद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019