Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज ठाकरेंनाही सोबत घेणार, अजित पवारांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 16:55 IST

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही.

मुंबईः राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार स्थापन करण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमधला संघर्ष विकोपाला गेलेला आहेत. तसेच सत्तेचं समान वाटप करण्यासही भाजपा तयार नाही, त्यातच आता शिवसेना भाजपाऐवजी राष्ट्रवादीबरोबर जाऊन सत्ता स्थापन करेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काळात कोणाची सत्ता येणार, याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत प्रभावी फॅक्टर ठरलेल्या मनसेबद्दलही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, मनसेच्या आमदाराला आम्ही आघाडीतर्फे पाठिंबा दिलेला होता. आम्हाला उद्याच्याला वाटलं की आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांना बरोबर घ्यावं. तर आम्ही नक्कीच विचार करू, किंबहुना राज ठाकरेंना सोबत घ्यावं हे माझं स्वतःचं मत विधानसभेलाही होतं. परंतु एकटा राष्ट्रवादी पक्ष याच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही. आघाडीमध्ये शेकाप, समाजवादी पार्टी, सीपीआय, सीपीएम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक मान्यवर होते. त्यामुळे आघाडीमध्ये एखाद्याला सहकारी म्हणून घेत असताना बाकीच्यांशीही मला चर्चा करावी लागेल. आमची आघाडीची बैठक होईल, त्यावेळी हा मुद्दा उपस्थित करेन, असं सूचक विधान अजित पवारांनी केलं आहे. पवारांच्या मुख्यमंत्रिपदावरही त्यांनी खुलासा केलेला आहे. 

असं काहीही होणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. मी 30 वर्षं आमदार म्हणून काम केलेलं आहे. ज्या गोष्टी पाहण्यात आल्या, त्याच्याबद्दल सूतोवाच केलं. त्यातून काहींनी कारण नसताना वेगळा अर्थ लावला. त्या अर्थाला काडीचाही आधार नाही. शिवसेनेबरोबर सत्ता स्थापनेशी साहेबांचा दुरान्वये संबंध येत नाही. चांगल्या लोकांच्या हातात महाराष्ट्र दिला गेला पाहिजे ही साहेबांची भावना होती. म्हणून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांना बदल करायचा होता, त्याकरिता ते प्रयत्नशील होते. त्यांच्याकडे 175 हा आकडा कसा आहे ते तेच सांगू शकतील. मी त्याबद्दल अधिकारवाणीनं सांगू शकत नाही. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019