Join us  

Maharashtra Election 2019: 'कलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 9:29 PM

मध्यंतरीच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत सर्वांशी बोललो, सर्व विरोधी नेत्यांची बोललो, पत्रकार परिषद घेतली

मुंबई - आज महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या ३७० कलमबद्दल बोलत आहेत. कलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध?' आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार? आमच्या बेरोजगार तरुणांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी कधी बोलणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गोरेगाव येथील सभेत भाजपाला केला आहे. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बुलेट ट्रेनला मी एकट्याने विरोध केला. मेट्रोच्या कार शेडसाठी मी जागा सुचवली होती, आरेत कारशेड नको ह्यासाठी मी आंदोलनात पुढाकार घेतला होता. सरकारला सांगितलं होतं की जिथून मेट्रो सुरु होत आहे तिथे कार शेड करा. पण सरकारला कोणाच्या घशात ती जागा, बीपीटीची जागा घालायची आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

तसेच ही निवडणूक मी एवढ्यासाठी लढवतोय की तुमच्या मनातला राग, तुमच्या मनातला सरकारविरोधातला जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी, आम्हाला निवडून यायचं आहे कारण सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल असं सांगत राज ठाकरेंनी जनतेला आवाहन केलं. सरकार म्हणतंय की आम्ही १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मुंबईत रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्डयांना मुख्यमंत्री 'विहिरी' म्हणत आहेत का? काय बोलतंय सरकार? आणि आता पुन्हा नवीन गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहे असा आरोपही राज यांनी केला. 

यावळी ईडी चौकशीवर बोलताना राज म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत सर्वांशी बोललो, सर्व विरोधी नेत्यांची बोललो, पत्रकार परिषद घेतली. त्याच दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूर आला, त्यावेळी २१ तारखेला मोर्चा काढणार होतो ते राहून गेलो, ईडी चौकशीनंतर सांगितलं माझं थोबाड थांबणार नाही. मला फरक पडत नाही. हे महाराष्ट्राचं वातावरण आहे, जो राग सरकारबद्दल लोकांमध्ये आहे, तो राग व्यक्त नाही झाला तर निवडणुका घ्यायच्या कशाला? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

दरम्यान, काँग्रेसचा विरोधी पक्षनेते भाजपात गेले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ते भाजपा-शिवसेनेतून निवडणूक लढवित आहेत. बाळासाहेब असताना शिवसेनेत आयात करायची गरज कधीच भासली नाही? कार्यकर्ते संभ्रमात आहेत नेता एका रात्रीत पक्ष बदलतोय, राजकारणाची थट्टा लावली आहे असंही राज यांनी सांगितले.  

टॅग्स :मनसेराज ठाकरेकलम 370महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपा