मतदान केंद्रात पतीसह मुलाचे नाव सापडले, पत्नीचे नाव शोधताना दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 05:19 IST2019-10-22T05:19:10+5:302019-10-22T05:19:34+5:30
दिव्यांग पत्नीला घेऊन केंद्राची शोधाशोधMaharashtra Election 2019:

मतदान केंद्रात पतीसह मुलाचे नाव सापडले, पत्नीचे नाव शोधताना दमछाक
मुंबई : भांडुपच्या महेंद्रा टॉवर परिसरात राहणारे शांता आणि संपतलाल सिंघवी हे दाम्पत्य मतदानाच्या दिवशी सोमवारी सकाळी ईश्वरनगर येथील पालिका शाळेत पोहोचले. तेथे पती आणि मुलगा दोघांचे नाव होते. मात्र पत्नीचे नाव गायब असल्याने सिंघवी दाम्पत्याची दमछाक झाली. पती, मुलाने मतदान केल्यानंतर दिव्यांग शांता सिंघवी यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रात आहे, हे शोधण्यात सिंघवी दाम्पत्याचा बराच वेळ गेला. त्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
भांडुप पश्चिमेत राहणाऱ्या सिंघवी यांच्या घरी मतदानाच्या स्लिप आल्या होत्या. त्यात संपतलाल सिंघवी आणि त्यांच्या मुलाची स्लिप होती. मात्र संपतलाल यांच्या पत्नी शांता यांची स्लिप नव्हती. पती व मुलाला ईश्वरनगर येथील पालिका शाळा हे ठिकाण मतदान केंद्र म्हणून आले होते. त्यामुळे शांता यांचेदेखील हेच केंद्र असेल असे समजून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भांडुप पश्चिमेत राहणारे सिंघवी दाम्पत्य मुलासह सकाळी ११ च्या ठोक्याला ईश्वरनगर येथील पालिका शाळेत मतदानासाठी पोहोचले.
केंद्रावर नाव असल्याने संपतलाल व त्यांच्या मुलाने मतदान केले. मात्र संपतलाल यांच्या पत्नी शांता यांचे नाव त्या केंद्रावरील यादीत सापडत नव्हते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीचे नाव कुठल्या यादीत आहे, हे शोधण्यातच वेळ गेला. तेथून त्यांना अन्य केंद्रावर जाऊन नाव शोधण्यास सांगण्यात आले. मात्र त्या केंद्रावरही नाव न सापडल्याने त्यांच्या संतापात भर पडली. मात्र कुणीच काही ठोस सांगण्यास तयार नव्हते. अखेर, रस्त्यांवर पक्ष कार्यकर्त्यांकडून मांडलेल्या टेबलांवर त्यांनी शांता यांच्या नावाचा शोध सुरू केला.
दिव्यांग असलेल्या शांता यांना सोबत घेऊन बराच वेळ शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे या दाम्पत्याची परवड झाली. अखेर, तासाभराच्या गोंधळानंतर एका महाविद्यालयीन तरुणाने आॅनलाइन माहिती मिळवून दिल्यानंतर पवार पब्लिक शाळेतील मतदान केंद्रात त्यांचे नाव असल्याचे समजले. त्यानुसार दुपारी साडेबाराच्या सुमारास ते तेथे गेले. तेथील शाळकरी स्वयंसेवक मुले त्यांच्या मदतीला धावून आली आणि अखेर शांता यांनी मतदानाचा हक्क बजावला.