Maharashtra Election 2019: 'उमेदवार श्रीमंत अन् मतदारसंघ गरीब; पैसे कमविण्याचं तंत्र मतदारांनाही सांगा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 16:19 IST2019-10-06T16:16:22+5:302019-10-06T16:19:18+5:30
उमेदवार निवडून देताना एकाच माणसाला निवडून का देता? एमपीएससीसारखी परीक्षा घेऊन त्यात पास होणाऱ्या लोकांनाचा पक्षांनी तिकीट द्यायला हवी

Maharashtra Election 2019: 'उमेदवार श्रीमंत अन् मतदारसंघ गरीब; पैसे कमविण्याचं तंत्र मतदारांनाही सांगा'
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला राज्यात सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अनेक उमेदवारांची संपत्ती प्रतिज्ञापत्रातून बाहेर आली. कोट्यावधी संपत्ती असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. हा एवढा पैसा कुठून कमवितात? पैसे कमविण्याची ही टेक्निक मतदारांना का शिकवित नाही? उमेदवार श्रीमंत अन् मतदार गरीब अशीच परिस्थिती आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते नामदेवराव जाधव यांनी केली आहे.
यावर बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, महाडच्या एका प्रचाराच्यावेळी तिथे असणाऱ्या तरुण मुलांना विचारलं तुम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार करताय? काय विचार आहे असं विचारल्यावर त्यांना याची कल्पना नाही. त्यांना विचारलं तुम्हाला काय दिलं? तर खाऊन-पिऊन ३०० रुपये अशा कमाईवर ही गर्दी जमविली जाते. जर १५ दिवसांत अशी कमाई होणार असेल तर निवडणुका पंचवार्षिक करण्यापेक्षा वार्षिक निवडणुका घ्याव्यात, अनेक कंत्राटातील पैसे काढून हे निवडणुकीत वापरले जातात असा आरोप त्यांनी केला.
तसेच उमेदवारांकडे एवढे पैसे आहेत तर निवडणुका न लढविता विकासकामे करा, एका माणसाने ४ वर्ष राष्ट्रवादीकडून तयारी केली, ऐन निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला गेला, त्यानंतर तो शिवसेनेकडे गेला तिथेही तिकीट मिळाली नाही मग तो भाजपाकडे गेला तिथे त्याला तिकीट मिळाली. इतकी पक्षांतर राज्यात होत आहे. रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहिली तर हाच विकास आहे का? असा प्रश्न उभा राहतो असं नामदेवराव जाधव यांनी सांगितले.
त्यामुळे उमेदवार निवडून देताना एकाच माणसाला निवडून का देता? एमपीएससीसारखी परीक्षा घेऊन त्यात पास होणाऱ्या लोकांनाचा पक्षांनी तिकीट द्यायला हवी. कोट्यावधी रुपये तिकीटासाठी मोजले जातात. बीमडब्ल्यू गाडी सहा लाखात मिळते का? जेवढे उमेदवार श्रीमंत तितका मतदारसंघ गरीब राहणार आहे. भविष्य घडविण्यासाठी योग्य माणसाला मतदान करा असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. जाती-जातीवर मतदान मागायला लागले आहेत. अस झालं तर महाराष्ट्राचे तुकडे होतील. त्यामुळे विकास, रोजगार, गरीब अशा मुद्द्यावर निवडणुका लढवाव्यात असं आवाहन नामदेवराव जाधव यांनी केलं आहे.