Join us  

शिवसेनेला सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्याची 'अशी' रणनीती; भाजपा कोअर कमिटीची पुन्हा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 9:31 AM

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भाजपाने सरकार बनविण्यासाठी असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेला राज्यपालांनी निमंत्रण दिलं आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची भाजपाने रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होत आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना महाआघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळू नये यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. 

शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळू नये अन् पुन्हा शिवसेना भाजपाच्या मागे यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळतेय, विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीच्या पारड्यात जनतेने १६२ जागा दिल्या. भाजपाला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा जिंकता आल्या. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन या दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला. मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही होते. मात्र शेवटपर्यंत भाजपाने शिवसेनेची मागणी मान्य केली नाही. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा १७ दिवसांहून अधिक सुरु आहे. भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले पण भाजपा नेत्यांनी सत्तास्थापन करण्यास असमर्थता दाखविली. शिवसेनेने राज्यातील जनतेच्या जनादेशाचा अनादर केला, अपमान केला असा आरोप करत भाजपाने शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबतीने सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, तर्तास शिवसेनेला जर पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं विधान राष्ट्रवादीने केलं होतं. त्यामुळे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे.  

टॅग्स :भाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस