Join us  

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुंबईत सत्ता युतीचीच, आदित्य ठाकरे यांचा विधानसभेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 3:39 AM

Maharashtra Election 2019: काँग्रेसला नाकारून शिवसेना, भाजपला कौल देण्याचा मुंबईकरांचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेला सिलसिला यंदाही कायम राहिला.

- रवींद्र मांजरेकरमुंबई : मुंबईच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रूपाने प्रथमच ठाकरे घराण्यातील व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत प्रवेश करेल. काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला म्हणजे मुंबादेवी आणि धारावी, ते पक्षाकडे कायम राहिले. तर चांदिवली पक्षाने अवघ्या ४०० मतांनी गमावला. राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. यंदा त्यांनी अणुशक्तीनगरचा मतदारसंघ खेचून आणला. 

काँग्रेसला नाकारून शिवसेना, भाजपला कौल देण्याचा मुंबईकरांचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेला सिलसिला यंदाही कायम राहिला. मुंबईच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे सेना नेते आदित्य ठाकरेंच्या रूपात लोकप्रतिनिधी म्हणून प्रथमच ठाकरे घराण्यातील व्यक्ती विधानसभेत प्रवेश करेल. त्याचवेळी म्वांद्रे पूर्व मतदारसंघातील बंडखोरीचा फटका सेनेला पुढील पाच वर्षे सलत राहील असा आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे परंपरागत बालेकिल्ले मानले गेलेले मतदारसंघ म्हणजे मुंबादेवी आणि धारावी ते पक्षाकडे कायम राहिले. तर चांदिवली त्यांनी अवघ्या ४०० मतांनी गमावला. राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नव्हती. यंदा त्यांनी अणुशक्तीनगरचा मतदारसंघ खेचून आणला. मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये समाजवादी पक्षाची जागा कायम राहिली, तर गेल्या वेळी एमआयएमकडे गेलेला भायखळ्याचा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणला.

मुंबईतील ३६ पैकी भाजप १६, शिवसेना १४, काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. २०१४च्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कायम राहिल्या असल्या तरी वांद्रे पूर्व, अणुशक्तीनगर या दोन हक्काच्या जागा त्यांनी गमावल्या. भाजपला वडाळ्यात कालिदास कोळबकरांच्या रूपाने यंदा एक जागा जास्त मिळाली. काँग्रेसला एका जागेचे नुकसान तर, राष्ट्रवादीला एका जागेचा फायदा झाला. मनसेला दोन-तीन मतदारसंघांत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

शहरात मुंबादेवी, धारावीचा अपवाद वगळता सेना, भाजप यांचा प्रभाव कायम राहिला. शहरातील दहापैकी केवळ भायखळा येथे बदल घडून आला. अन्य मतदारसंघात संबंधित राजकीय पक्षांना आपापला गड राखण्यात यश आले. कुलाबा येथे भाजपने विद्यमान आमदाराऐवजी आयारामला संधी दिली. तर भायखळ्यात काँग्रेस, एमआयएम, शिवसेना, अखिल भारतीय सेनेच्या उमेदवारीमुळे येथे चौरंगी लढत होती. माहिम येथे शिवसेना विरुद्ध मनसेत सामना रंगणार होता. शिवसेनेच्या नाराजीमुळे वडाळ्यामध्ये भाजपची जागा धोक्यात येण्याची शक्यता होती. मात्र या सर्व लढतींमध्ये काहीच चुरस दिसली नाही.

कुलाबा येथे भाजपचे राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा पराभव करीत गड राखला. मुंबादेवी, धारावीत काँग्रेसला पुन्हा विजय मिळला. मलबार हिल, वडाळा येथील लढतही एकतर्फीच ठरवित अनुक्रमे भाजपचे मंगल प्रभात लोढा, कालिदास कोळंबकर जिंकले. शिवडीतही एकतर्फी लढतीत सेनेचे आमदार अजय चौधरी विजयी झाले. अटीतटीची शक्यता असलेल्या भायखळा येथेही सेनेच्या यामिनी जाधव सहज जिंकल्या. काँग्रेसचे मधू चव्हाण, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांच्यामुळे एमआयएमचे वारिस पठाण यांच्या मतांची विभागणी होऊन येथे पहिल्यांदा सेनेला विजय मिळवता आला. सायन कोळीवाड्यात भाजपची जागा धोक्यात आली असती, पण मनसे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला फटका बसला.

पश्चिमेत युतीचा ठसा कायम

वांद्रे पूर्वेतील बंडामुळे ही हक्काची जागा सेनेने गमावली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांनी पराभव केला. वांद्रे पश्चिमेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर चारकोपमधून, राज्यमंत्री विद्या ठाकूर गोरेगाव येथून तर जोगेश्वरी पूर्वमधून रवींद्र वायकर जिंकले. मनीषा चौधरींनी दहिसरची जागा कायम राखली. बोरीवलीत सुनील राणे जिंकले. मालाड पश्चिमेत अस्लम शेख यांनी कडवी झुंज दिली. अंधेरी पश्चिमेत अमित साटम, कांदिवली पूर्वेत अतुल भातखळकर, अंधेरी पूर्वेत रमेश लटके, मागाठाणेत प्रकाश सुर्वे, दिंडोशीत सुनील प्रभू यांनी विजयी परंपरा कायम राखली.पूर्व उपनगरात मराठी मतांची साथ

मुलुंड ते मानखुर्द-शिवाजीनगर पट्ट्यात युतीचा विजय झाला. भांडुप, कांजूरमध्ये झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमुळे भांडुप, मुलुंडमधील मनसे उमेदवारांच्या मतांमध्ये वाढ झालेली दिसली. यात, भांडुपमध्ये मनसे उमेदवाराला ४२ हजार मते मिळाली. घाटकोपर पूर्व हा भाजपचा बालेकिल्ला. येथे माजी गृहमंत्री प्रकाश मेहता सलग पाच वेळा निवडून आले होते. परंतु त्यांना उमेदवारी नाकारत भाजपने पराग शहा यांना उमेदवारी दिली. यामुळे कार्यकर्ते चिडले. अंतर्गत वाद बाहेर आले. अखेर शहा विजयी झाले. मानखुर्द-शिवाजीनगरात मुस्लीम मतदारांनी आझमी यांना निवडून दिले. सेनेच्या विठ्ठल लोकरे यांचा पराभव झाला. अणुशक्तीनगर येथे नवाब मलिक यांनी गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढत राष्ट्रवादीला मुंबईत पुन्हा खाते उघडून दिले. तर कुर्ल्यात सेनेचे मंगेश कुडाळकर यांनी सहज विजय मिळवला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपाकाँग्रेस