'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात ४२ जणांना समन्स; शोचे अकाऊंट ब्लॉक करण्याचे सायबर विभागाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:54 IST2025-02-17T18:52:00+5:302025-02-17T18:54:48+5:30
'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने ४२ व्यक्तींना समन्स बजावले आहे.

'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात ४२ जणांना समन्स; शोचे अकाऊंट ब्लॉक करण्याचे सायबर विभागाचे आदेश
India's Got Latent Case: युट्यूबर समय रैनाच्या शो 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये अश्लील टिप्पणी केल्याबद्दल महिला आयोगाने रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्वा माखिजा आणि इतर युट्यूबर्सना समन्स बजावले होते. मात्र, त्यापैकी कोणीही आपलं म्हणणं मांडले नाही. त्यानंतर आता महिला आयोगाने आता नवीन तारीख जाहीर केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सायबर सेलने यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला २४ फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. तसेच या शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर सेलने दिली आहे.
कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना आणि अपूर्वा मखिजा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राष्ट्रीय महिला आयोगासमोर हजर झाले होते. या दोघांनी महिला आयोगाकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आता या प्रकरणातील सर्व लोकांना नवीन तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रणवीर अलाहाबादिया, अपूर्व मखिजा, आशिष चचलानी आणि तुषार पुजारी यांना ६ मार्चला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर समय रैना आणि जसप्रीत सिंग यांना ११ मार्चला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्र सायबर सेलने एकूण ४२ व्यक्तींना समन्स बजावले आहे.
"इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व भागांमध्ये भूमिका बजावणाऱ्या सर्व सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी चौकशी अंतर्गत असलेले सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले होते आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत शोचे अकाऊंट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. सायबर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पहिला वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला आणि नंतर समय रैनाला या प्रकरणाशी संबंधित सर्व गोष्टी काढून टाकण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत कलाकार, निर्माते आणि इन्फ्लुएंसर कलाकारांसह एकूण ४२ व्यक्तींना समन्स बजावण्यात आले आहे. प्रथमदर्शनी आरोपींमध्ये समय रैना, अपूर्वा मखिजा आणि रणवीर अलाहबादिया यांचा समावेश आहे. देवेश दीक्षित, रघु राम आणि आणखी एका व्यक्तीचा जबाब आधीच नोंदवण्यात आला आहे," अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली.