महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 05:43 IST2026-01-06T05:43:06+5:302026-01-06T05:43:06+5:30
अशीच मनमानी होत राहिली तर खेळाडूंना कधीही न्याय मिळणार नाही, असे ताशेरेही ओढले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील (एमसीए) नियमबाह्य सदस्य भरती व संघटनेचा मनमानी कारभार ही अतिशय गंभीर बाब असल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी ‘एमसीए’च्या सर्वसाधारण निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली. याबाबतचे आदेशपत्र मंगळवारी सकाळी देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
‘एमसीए’ची निवडणूक सहा जानेवारीला नियोजित होती. या निवडणुकीआधी अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजीव सदस्यांची संख्या १५४ वरून थेट ५७१ वर नेण्यात आली होती. त्यामुळे माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आमच्या लढ्याला न्याय मिळाला : ठक्कर
एमसीएमधील घराणेशाहीविरोधात आम्ही उभे ठाकलो. एमसीएच्या निवडणुकीला स्थगिती मिळाल्यामुळे आमच्या लढ्याला न्याय मिळाला आहे. अनियमितता, मनमानीविरोधात आम्ही असेच सातत्याने लढत राहू. आमचा लढा खेळ आणि खेळाडूंसाठी आहे, असे लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी म्हटले आहे.
कोर्टात जोरदार वादविवाद
ॲड. विनीत नाईक आणि ॲड. अभिनव चंद्रचूड यांनी ‘एमसीए’च्या अनियमिततेवर बोट ठेवले, तसेच नियमबाह्य पद्धतीने सदस्यवाढ केल्याची माहिती न्यायालयाला दिली. ॲड. अभिषेक मनुसंघवी यांनी एमसीएने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा दावा केला.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्या. आश्विन दामोदर भोबे यांनी एमसीएने नियमांचे उल्लंघन करून सदस्य भरती केली असून, ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. अशीच मनमानी होत राहिली तर खेळाडूंना कधीही न्याय मिळणार नाही, असे ताशेरेही ओढले.
निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश : आदेशाची प्रत मंगळवारी देण्यात येणार असून, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे नेऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमसीए’चे निवडणूक अधिकारी अशोक लवासा व के. एफ. विल्फ्रेड यांना दिले.