Join us  

Maharashtra CM: होय, आम्ही अजित पवारांसोबत; 'या' आमदाराने दिली लोकमतला प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 2:38 PM

Maharashtra News: काँग्रेसने एक महिन्यापासून घोळ चालवला होता दररोज एक अपेक्षा वाढत होती नवनवीन पद मागत होते

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळात राष्ट्रवादी आमदारांचा एक गट अजित पवारांसोबत जावून भाजपाशी हातमिळवणी केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथ दिली. मात्र या संपूर्ण नाट्यात पवार कुटुंबातील कलह लोकांसमोर आला आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदारांपैकी काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याची माहिती आहे. 

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील म्हणाले की, सरकार भाजप आणि राष्ट्रवादीचेच स्थापन होईल काँग्रेसने एक महिन्यापासून घोळ चालवला होता दररोज एक अपेक्षा वाढत होती नवनवीन पद मागत होते म्हणून सकाळी निर्णय घेतला मी पवारांसोबत व राष्ट्रवादी सोबत आहे एकदा निर्णय घेतला अजित पवारांसोबत जायचे उचललेले पाऊल टाकले आता देखील अजित पवार यांच्यासोबत फिरत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमत शी बोलताना दिली 

तसेच सध्याची राजकीय परिस्थीती पाहता दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्यच नव्हते. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्याकडे विविध पर्याय असल्याची भूमिका सुरुवातीपासूनच मांडली. राज्याची बिकट स्थिती लक्षात घेऊन राज्याच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापनेसाठी आमचेकडे आवश्यक बहुमत असुन विहीत मुदतीत ते सिध्द करु असा दावा भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. 

दरम्यान शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. सकाळी साडेसहा राज्यपाल इतका मोठा निर्णय घेतात हे आम्ही पहिल्यांदा पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य अजित पवारांसोबत गेले असं सांगण्यात आलं. मात्र हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ सदस्य असो वा कार्यकर्ता तो भाजपासोबत सत्ता बनविण्यासाठी तयार नाही अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. 

त्याचसोबत जे सदस्य गेलेत किंवा जाणार असतील त्यांना २ गोष्टी आठवण करुन देतो. पक्षांतर बंदीच्या कायदा देशात आहे, त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं. महाराष्ट्रातील जनमानस हा भाजपाविरोधी आहे. सत्तेविरोधात जनमत असताना अशा व्यक्तींच्या विरोधात मतदारसंघातील सामान्य माणूस कदापि उभा राहणार नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून त्या व्यक्तींविरोधात उमेदवार देऊ, अन् जे फुटले आहेत त्यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.  

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारभाजपा