Join us  

Maharashtra CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला; मंत्रालयात झालं जोरदार स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 3:18 PM

Maharashtra News: ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती इतक्या मोठा पदावर विराजमान झाली आहे.

मुंबई - राज्याचे २९ वे मुख्यंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, नेते दिवाकर रावते, डॉ. निलम गोऱ्हे यांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते.

त्यामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारीही नवीन मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात मंत्रालयाच्या प्रांगणात जमले होते. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केले. त्यानंतर सातव्या मजल्यावर जाऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला. 

तत्पूर्वी मंत्रालयात पोहचण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्रातील शहीदांना अभिवादन केले. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती इतक्या मोठा पदावर विराजमान झाली आहे. आदित्य ठाकरे हेदेखील पहिल्यांदा आमदार झाले आहेत. 

दरम्यान, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी समारंभावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी शपथ घेण्यापूर्वीच काही नेत्यांची नावं घेतली होती, राज्यपालांच्या मते हे शपथ ग्रहण समारंभाच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. तसेच या शपथ ग्रहण समारंभात सरकारी यंत्रणेला सहभागी करून न घेतल्यानंही राज्यपाल नाराज आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथ ग्रहण समारंभादरम्यान मंचावरची व्यवस्था योग्य नव्हती. शपथ ग्रहण समारंभादरम्यान प्रशासनाला मंचावरची व्यवस्था करू दिली नाही. त्यामुळे ही त्यात बऱ्याच त्रुटी होत्या, असंही ते म्हणाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे यासंदर्भात नाराजीही व्यक्त केली आहे. शपथविधीदरम्यान नेत्यांची नावं घेण्यात आल्यानं राज्यपाल नाराज आहेत.  

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीशिवसेनामहाराष्ट्र सरकार