Join us  

Maharashtra CM: राष्ट्रवादीतील फूट टाळायची असेल तर अजितदादांसोबत चला; आमदारांचा 'इरादा पक्का', काय करणार काका?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 6:13 PM

अजित पवार यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी घेले होते.

मुंबई: शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार अशा घडामोडी सुरू असतानाच आज राजभवनातून मोठी घडामोड समोर आल्याने सर्वांना धक्काच बसला. भाजपाने सत्तास्थापेसाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस  यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी घेले होते. मात्र त्यांना अजित पवरांची समजूत काढण्यात अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवारांनी शरद पवारांना आमदारांमार्फत पाठवण्यात आला असल्याची  माहिती समोर आली आहे.

अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. यातील आतापर्यंत ७ आमदार पक्षात पुन्हा परतले आहेत. यामध्ये दिलीप बनकर, नानासाहेब झिरवळ, माणिकराव कोकाटे, संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा, डॉ. राजेंद्र शिंगणे आणि सुनील शेळके असे आमदार राष्ट्रवादीसोबत कायम राहिलेले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या बैठकीत नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे कालपासून कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे धनंजय मुंडेबाबत संशयाचं वातावरण पाहायला मिळत होतं.

भाजपाला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून बहुमत सिद्ध करु, शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल, आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहणार, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ४ वाजता होणार आहे. त्यात नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :अजित पवारदेवेंद्र फडणवीसशरद पवारभाजपाशिवसेना