Join us  

Maharashtra CM: आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 8:59 AM

आरेमधील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत, त्यांची यादी मुंबई पोलिसांनी द्यावी,

मुंबई  - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मागील काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असल्याचा टोला भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केला आहे. 

याबाबत मोहित भारतीय यांनी ट्विट करुन म्हटलंय की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. 

तसेच महाराष्ट्रात लोकशाहीची अशी अवस्था  पाहावयाला मिळत आहे की, विधानसभेत 288 उमेदवार निवडून येऊनसुद्धा त्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 

त्याचसोबत आरेमधील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत, त्यांची यादी मुंबई पोलिसांनी द्यावी, मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यावरील गुन्हे मागे घेतलेत ते ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट पक्षाची माणसं आहेत. यामागे राजकारण काय आहे? असा सवालही मोहित भारतीय यांनी उपस्थित केला आहे. 

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्रालय माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले होते की, आरे कॉलनीत आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितले होते. तसेच आरे आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. 

त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :दाऊद इब्राहिमशिवसेनाउद्धव ठाकरेभाजपाआरे