Maharashtra Budget Session 2022: मंत्र्यांसमोरच आमदाराचे खाली डोके, वर पाय; संजय दौंड यांचे अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 05:31 IST2022-03-04T05:30:41+5:302022-03-04T05:31:18+5:30
Maharashtra Budget Session 2022: पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी निदर्शने करत आक्रमक पवित्रा घेतला.

Maharashtra Budget Session 2022: मंत्र्यांसमोरच आमदाराचे खाली डोके, वर पाय; संजय दौंड यांचे अनोखे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी निदर्शने करत आक्रमक पवित्रा घेतला. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आंदोलन केले, तर राज्यपालांनी अभिभाषण पूर्ण न केल्याने मंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांनी निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आ. संजय दौंड यांनी तर थेट पायऱ्यांवर शीर्षासन करत राज्यपालांचा निषेध केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. राज्यपालांचे अभिभाषण सुरू होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आमदारांनी घोषणाबाजी करीत राजीनाम्याची मागणी लाऊन धरली. यावेळी आशिष शेलार, अतुल भातखळकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते, तर मंत्री आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, नाना पटोले यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशी घोषणाबाजी केली.
संजय दौंड यांचे अनोखे आंदोलन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधातील सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे आ. संजय दौंड यांनी शीर्षासन करत राज्यपालांचा निषेध केला. दौंड हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत.