दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 06:32 IST2025-03-11T06:31:20+5:302025-03-11T06:32:05+5:30

लाडक्या बहिणींना १५००च; २१००च्या घोषणेला मात्र 'खो'

Maharashtra budget presented to the legislature showed a dearth of new announcements | दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर

दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर

मुंबई : विधिमंडळात सोमवारी सादर झालेल्या राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात नवीन घोषणांचा दुष्काळ दिसून आला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये महिना देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची घोषणा मात्र झालीच नाही. एकूणच आर्थिक मर्यादांचा सामना करीत असलेल्या महायुती सरकारने 'अर्थ' कमी आणि 'संकल्प' अधिक असलेला अर्थसंकल्प दिला आहे. असे असले तरी थोर पुरुषांच्या अनेक स्मारकांची घोषणा सरकारने केली आहे. लोकानुनय करणाऱ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात निधीची तरतूद करायची नाही असे अनेकदा केले जाते. या सरकारने तो मोह यावेळी टाळला आहे.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सादर केलेल्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात नवीन घोषणांचा पाऊस पाडत हजारो कोटींच्या योजना जाहीर केल्या. मात्र, सोमवारच्या अर्थसंकल्पात चालू कामे पूर्ण करण्यावर भर दिल्याचे स्पष्टपणे जाणवते. अर्थसंकल्प एका वर्षासाठी असला तरी अनेक बाबतीत ५ वर्षात काय करणार हे व्हिजन मांडण्यात आल्याचे दिसते. तसेच घोषणांऐवजी नवीन धोरणे कोणती आणणार यावर भर देण्यात आला आहे. आधी जाहीर झालेली धोरणे आणि त्यातून राज्याला होणारा लाभ याची आकडेवारी अर्थसंकल्पात देण्यात आली आहे.

नवीन औद्योगिक धोरण लवकरच 

नवीन औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्या धोरणाच्या ५ वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असेल. अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, जेम्स अॅन्ड ज्वेलरी धोरण, सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत.

१६ लाख रोजगार

दावोस गुंतवणूक करारांचा आधार घेत १५.७२ लाख कोटींची गुतवणूक राज्यात होईल आणि १६ लाख रोजगार मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये ६४०० कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

कधीपासून मिळणार लाडक्या बहिणींना २,१०० रुपये?

लाडकी बहीण योजनेसाठी जुलै २०२४ पासून ९ महिन्यात ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दरमहा १,५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. अर्थसंकल्पात या योजनेवर २०२५-२६ साठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत आता दरमहा २,१०० रुपये दिले जातील अशी कोणतीही २ घोषणा अजित पवार यांनी केली नाही. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला तर त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना विचाराधीन असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे.

आम्ही जाहीरनाम्यात जे सांगितले त्यावर अंमलबजावणी करू. सध्या तरी १,५०० रुपये गृहित धरून निधीची तरतूद केली आहे. जाहीरनाम्यातील आश्वासनापासून आम्ही दूर जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

२१०० ची घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून मिळतील

लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत. योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर महिना आहे. आवश्यक तेवढी तरतूद केली आहे. त्यासंदर्भात निश्चितपणे आमचे काम चालले आहे. समतोल राखणेही महत्त्वाचे आहे. घोषणा दिली आहे, तर ती पूर्ण करायची आहे. योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतुदही महत्वाची असते. समतोल राखत पुढे जायचे आहे. आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार. एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळतील. आम्ही २,१०० रुपये कधी मिळणार ते घोषित करु. जेव्हा घोषित करु त्याच्या पुढच्या महिन्यांपासून २,१०० रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली ३,५८२ गावे ही १४ हजार किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गाना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. त्यावर ३० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा सुरू आहेत. त्यांचे योग्य संतुलन राखणारे हे चॅम्पियन बजेट आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही हा निर्धार अर्थसंकल्पातून व्यक्त होतो - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

प्रमुख घोषणा 

मेट्रो- या वर्षात मुंबईत ४१ किमी, पुण्यात २३ किमी आणि नागपूर मेट्रोचे ४३ किमी मार्ग पूर्ण होतील. 
हरित ऊर्जा- एसटी महामंडळाच्या ६ हजार डिझेल बसेस सीएनजीमध्ये परिवर्तीत करणार 
बांबू आधारीत उद्योग- ४ हजार ३०० कोटींची बांबू वृक्षारोपण योजना. कृषी व्यवसाय केंद्रासाठी २१०० कोटी
१,५०० किमीचे रस्ते- प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १,५०० किमीचे ग्रामीण रस्ते. 
टेक्सटाइल मिशन- 'महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाइल मिशन'ची स्थापना करणार 
अर्बन हाट केंद्र-हातमाग विणकरांसाठी नागपूर येथे 'अर्बन हाट केंद्रां'ची स्थापना
इनोव्हेशन सिटी- नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे.

नवीन स्मारके कोणती आणि किती स्मारकांचे काम प्रगतिपथावर ? 

छत्रपती संभाजी महाराज यांचे कोकणातील संगमेश्वर येथे भव्य स्मारक

शंभुराजेंचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर अन् समाधीस्थळ वढु बुद्रुकमध्ये भव्य स्मारकाचे काम प्रगतिपथावर 

पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण.उर्वरित कामासाठी ५० कोटींची तरतूद
 
आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भव्य स्मारक

लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे स्मारक

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण. दुसऱ्या टप्प्यासाठी २२० कोटींचा निधी 

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी पुरेसा निधी 

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे स्मारक 

संगमवाडी, पुणे येथील वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम प्रगतिपथावर
 

Web Title: Maharashtra budget presented to the legislature showed a dearth of new announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.