यदु जोशीमुंबई : भाजपचे राज्यातील आमदार आणि नेते मिळून पन्नासएक जण सध्या केरळमधील विधानसभा निवडणूक प्रचारात आहेत. तिथे त्यांना आपल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळाच भाजप अनुभवायला मिळत आहे. तिथले कार्यकर्ते स्वतःच पोस्टर चिटकवतात, स्वतःच प्रचाराच्या भिंती रंगवतात, असे बरेच काही तिकडे वेगळे आहे. महाराष्ट्रातील आमदार, नेत्यांनी भाषेचा अडसर वेगवेगळ्या पद्धतीने दूर केला आहे.
'आपल्याकडे जो भाजप चार दशकांपूर्वी होता, तो आज केरळमध्ये बघायला मिळतो. त्याकाळी महाराष्ट्रात पक्षाकडे नेते, कार्यकर्ते मोजकेच होते, पण निष्ठावंत होते. सतरंजीवर बसून चिवडा खायचे तेच चित्र केरळमध्ये आज आहे. देशभक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील अपार निष्ठा, तत्त्वाने चालण्याची रित ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगी ठासून भरलेली आहे. अगदी दहा जणांचीही बैठक असू द्या , तिची सुरुवात वंदे मातरम् नेच होते.
पैसे घेऊन मतदान नाही; पक्षाप्रति कार्यकर्त्यांची अपार निष्ठा
आपल्याकडील निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर होता, तिकडे कोणताही पक्ष तसे करत नाही. मतदानासाठी कोणताही पक्ष पैसे वाटत नाही. मतदानासाठी पैसे घ्यायचे असतात, असा विचार तेथील मतदारदेखील करत नाहीत.
आपल्याकडे निवडणुकीच्या आधी हजारो लोक या पक्षातून त्या पक्षात जातात. केरळमध्ये वर्षानुवर्षे एकाच पक्षाशी निष्ठा राखणारे केवळ नेते, कार्यकर्तेच नाहीत तर कुटुंबांच्या कुटुंबे आहेत.
डाव्या पक्षांची एलडीएफ, काँग्रेसप्रणित युडीएफ यांच्यात मुख्य सामना होत असताना, भाजपप्रणित एनडीए अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. संघाचे स्वयंसेवक भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत.
पार्ष्या, भपकेबाज प्रचाराला फाटा
भपकेबाज प्रचारापासून सगळेच पक्ष दूर राहतात. घरोघरी जाऊन मत मागण्यावर भर दिला जातो. कार्यकर्त्यांना गाड्या, दारू, मटणाच्या पार्टी, असे काही नको असते. विशालकाय पोस्टर, बॅनर लावले जात नाहीत. पक्षांचे चिन्ह अंकित असलेल्या पताका तेवढ्या लावल्या जातात. आपल्याकडे गावोगावी वेगवेगळे मेळावे आणि जेवणावळी असे असते, पण तिकडे तसे नाही, अगदी दोनचार मोजके मेळावे होतात.
भाषेसाठी अॅपचा आधार
आपल्याकडून गेलेल्या आमदारांना मल्याळम भाषा येत नाही. त्यामुळे गुगल ट्रान्सलेशन अॅपचा आधार काहींनी घेतला. समोरची व्यक्ती मल्याळममध्ये बोलते, तेव्हा ते मराठीत ऐकू येईल आणि टाइप होईल, अशी त्यात सोय आहे. दोन आमदारांनी आपल्याकडचे मल्याळी कार्यकर्ते सोबत नेले आहेत. पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनीअर राहिलेला श्रीजीत हा एका आमदाराला मदत करीत आहे. त्रिवेंद्रमसारख्या शहरात मराठी कुटुंबे आहेत, ते दुभाषी बनून मदत करत आहेत. सचिन कल्याणशेट्टी, प्रताप अडसड, परिणय फुके, प्रवीण दटके, सुमित वानखेडे, श्वेता महाले या आमदारांनी अनुभव सांगितले.
Web Summary : Maharashtra BJP leaders campaigning in Kerala find a more grassroots, dedicated party culture focused on ideology, frugality, and door-to-door campaigning, contrasting with Maharashtra's election practices.
Web Summary : केरल में चुनाव प्रचार कर रहे महाराष्ट्र भाजपा नेताओं ने विचारधारा, मितव्ययिता और घर-घर जाकर प्रचार पर केंद्रित एक अधिक जमीनी स्तर की, समर्पित पार्टी संस्कृति पाई, जो महाराष्ट्र की चुनावी प्रथाओं के विपरीत है।