Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही मनधरणी यशस्वी होणार का, याचे उत्तर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर मिळणार आहे. महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. मविआतील घटक पक्षांनी एकाच मतदारसंघात दोन उमेदवार दिले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही मैत्रीपूर्ण लढतीत पडणार नाही. महाराष्ट्रात सात ते आठ ठिकाणी दोन-दोन उमेदवार आहेत. मुलुंडच्या अधिकृत उमेदवार संगीता वाजे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिला आहे. तरी तिथे काँग्रेसच्या उमेदवाराने एबी फॉर्म घेऊन अर्ज भरला. आम्ही त्यांना अधिकृत मानत नाही. असे काही ठिकाणी घडलेले असेल तर आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
एकास एक लढत होईल, याची आम्ही काळजी घेऊ
काही ठिकाणी गैरसमजातून घडले आहे तर काही ठिकाणी का घडले याचा आम्ही शोध घेत आहोत. काही ठिकाणी आमचे शिवसेनेच्या त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यात जुन्नर, चंद्रपूर, मुंबईत एक दोन मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादीकडून काही ठिकाणी झाले आहे. काँग्रेसकडून काही ठिकाणी झाले आहे. सातत्याने आम्ही तीनही पक्षाचे नेते संवाद आणि संपर्कात आहोत. हे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि एकास एक लढत होईल, याची आम्ही काळजी घेऊ, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, परंडा आणि अजून एक दोन ठिकाणी दोन ए बी फॉर्म गेलेले आहेत. निवडणूक काळात कोण काय आरोप करत आहे, हे फार गांभीर्याने घ्यायचे नसते. काही जागा या मित्र पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागा होत्या. त्या जागांवर वारंवार चर्चा होऊन तडजोड होऊ शकली नाही. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या अनेक जागा आम्ही सोडल्या नाही. काँग्रेसच्या जागा ते सोडू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी आपल्या निवडून आलेल्या जागा सोडायला तयार नव्हते. हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. भिवंडीच्या जागेविषयी आम्ही प्रयत्न केले. पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिकडे आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले. पण समाजवादी पार्टीने जागा सोडली नाही. अशावेळी आमच्या समोर दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.