Join us

“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:29 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आपल्याकडे चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुलांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले चांगले होणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक लढवणाऱ्या बहुतांश पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘आम्ही हे करू’ या यावाने राज ठाकरे यांनी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 

मनसेच्या जाहीरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांशी संवाद साधताना रोखठोक भूमिका मांडली.  

छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा

ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची मंदिरे उभारण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. मला असे वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची मंदिरे उभी करण्यापेक्षा विद्या मंदिरे उभी राहण्याची गरज आहे. गड-किल्ल्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. काहीतरी गल्लत होते आहे. राज्यातील अनेक चौकाचौकांमध्ये महाराजांचे पुतळे आहेत. विद्यामंदिरे होणे गरजेचे आहे, ती चांगली होणे गरजेचे आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे गड-किल्ले चांगले होणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्राचे आर्थिक गणित पाहिल्याशिवाय तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. राज्यावर बोजा येऊ न देता पुढेही सुरू राहिली, तर त्याला मी गिफ्ट म्हणेन. परंतु, काही कारणास्तव या गोष्टी पुढे कायम ठेवता आल्या नाही, तर त्याला मी लाच म्हणेन. राज्याच्या आर्थिक रचनेला धक्का न लागता या गोष्टी केल्या पाहिजेत. महिलांना पैसे मिळतात, याबाबत दुःख नाही. उलट याचा आनंदच आहे. महिलांना चार पैसे मिळतात, चांगली गोष्ट आहे. परंतु, यातून आपण पुढे वेगळे खड्डे खणत नाही ना, याचा विचार व्हायला हवा, असे राज ठाकरे यांनी नमूद केले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मनसेराज ठाकरे