Join us

घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:19 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: या बैठकीत काय घडले, ही बैठक कशासाठी होती, याबाबत बाळा नांदगावकर यांनी सविस्तर माहिती दिली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठी खलबते सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. निकालाच्या शक्यतांचा विचार करता रणनीती कशी आखावी, यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत. अपक्षांसोबत बोलणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. एक्झिट पोल आल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले आडाखे बांधायला सुरुवात केली असून, सत्तास्थापनेची संधी मिळाल्यावर ऐनवेळी काही गडबड व्हायला नको, या अनुषंगाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. 

मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत काय घडले, ही बैठक कशासाठी होती, याबाबत बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाचं लग्न आहे. म्हणून ते सकाळी राज ठाकरेंकडे आले होते. त्यांनी राज ठाकरेंना पत्रिका दिल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांकडे पत्रिका द्यायला जात होते. ते म्हणाले की चला सोबत, म्हणून मीही त्यांच्याबरोबर आलो. देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाली. या भेटीदरम्यान मी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. तसेच, निवडणुकीत त्यांनी मला पाठिंबाही दिला होता, म्हणून मी त्यांचे आभार मानले. राजकारणाबाबत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते घेतील, तो त्यांचाच अधिकार आहे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभेच्या निकालापूर्वी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपा नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे.  यात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पराग शाह, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, या प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या बैठकीत मनसेचे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकरही सहभागी झाले.

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४बाळा नांदगावकरदेवेंद्र फडणवीस