Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
पत्रकारांशी बोलताना, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल
विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदाही काँग्रेस महाविकास आघाडीलाच होईल. मविआला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही. निवडून आलेल्या आमदारांना काँग्रेस पक्षाने हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे का, यावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे आमदार कठीण परिस्थितीतही पक्षासोबत राहिले आहेत त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही.
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला?
ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री होणार का, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाबाबत काय फॉर्म्युला ठरला आहे, असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील, असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.