Join us

“गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीसांमध्ये मोठा बदल घडला, अभिनंदन केलेच पाहिजे”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:38 IST

Maharashtra Assembly Session December 2024: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना महायुतीला टोलेही लगावले.

Maharashtra Assembly Session December 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतु, त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून आले. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर भाषण करताना बोलत होते. 

गेल्या ५ वर्षांत देवेंद्र फडणवीसांमध्ये मोठा बदल घडला

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांपूर्वी 'मी पुन्हा येईन' म्हणाले होते. पण ते पुन्हा आलेच नाहीत, दुसरीकडे बसले. मात्र, या पाच वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांच्यात काय बदल झाले, हे मगाशी त्यांच्या भाषणातून दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांनी आताच्या आपल्या भाषणातून विरोधी पक्षासोबत पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या या कृतीचे स्वागत करतो. त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, आज ते पु्न्हा ताकदीने सभागृहात येऊन बसले आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्ष हा किती मोठा किंवा लहान आहे यापेक्षा तो जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे काम करत असतो. तुमची संख्या जास्तच आहे. तुमच्याकडे २३७ आमदारांचे संख्याबळ आहे. आता तु्म्ही तिघांनी मन एवढे मोठे केले पाहिजे की,  आपल्या बाजूने २३७ नव्हे तर २८८ जणांचे सभागृह आहे, असे मानले पाहिजे. आम्ही यापूर्वी सभागृह आणि निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन तुम्हाला लक्ष्य केले. पण जनतेने त्यानंतर निकाल दिला आहे. त्यामुळे आता तु्म्ही सरकार चांगल्या पद्धतीने चालवाल, अशी अपेक्षा आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :विधान भवनविधानसभाजयंत पाटीलदेवेंद्र फडणवीसराहुल नार्वेकर