Join us

ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

By अतुल कुलकर्णी | Updated: November 24, 2024 06:36 IST

मुंबई, ठाण्यात काँग्रेसने स्वत:च्या हाताने करून घेतली स्वत:ची दारुण स्थिती 

अतुल कुलकर्णी मुंबई - मुंबई कुणाची... शिवसेनेची... अशा घोषणा मुंबईत सतत ऐकायला मिळतात. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मुंबई भाजपची आणि उद्धव ठाकरे यांची, तर ठाणे मात्र एकनाथ शिंदेंचे यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सगळ्या गदारोळात काँग्रेस पक्षाने मात्र स्वतःची अवस्था अत्यंत दारुण करून घेतली आहे. काँग्रेसच्या या अवस्थेला काँग्रेसच जबाबदार आहे. 

मुंबईत ३६ जागा आहेत. भाजपाने १९ जागी उमेदवार उभे केले होते, त्यातले १६ उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी २२ जागा लढवल्या, त्यातील ११ जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश आले. एकनाथ शिंदे यांनीही मुंबई १४ जागी उमेदवार उभे केले होते. त्यातील ४ उमेदवार विजयी झाले. याउलट ठाण्यात घडले. ठाण्यात विधानसभेच्या १८ जागा आहेत. तेथे ठाकरे यांनी १० उमेदवार उभे केले होते. ते सर्वच्या सर्व पराभूत झाले. याउलट भाजपाने ठाण्यात १००% यश मिळवत उभे केलेले सर्व ९ उमेदवार विजयी केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ उमेदवार ठाण्यात उभे केले. त्यातील ६ विजयी झाले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह समाजवादी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळाले. 

या दोन्ही ठिकाणी मिळून मनसेने ४१ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. मात्र, मनसेने मिळविलेल्या मतांमुळे भाजपच्या यशाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालघर रायगड मावळमधील १३ जागांपैकी एकही जागा काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना जिंकता आली नाही. याउलट भाजपने पालघर मध्ये ३, रायगडमध्ये १ आणि मावळमध्ये २ अशा ६ जागा जिंकल्या. शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पालघर २, रायगड २ आणि मावळ १ अशा ६ जागा जिंकल्या. 

पाच मुद्द्यांत विश्लेषण

भाजपने कटेंगे बटेंगे मुद्दा काढला. त्याच वेळी महाविकास आघाडीला मुस्लीम समाजाने पाठिंबा जाहीर केला. यातून हिंदू विरुद्ध मुस्लीम असे चित्र तयार झाले.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची कोणालाही सोबत न घेण्याची वृत्ती पराभवाला कारण ठरली.

मुंबईत भाजपाने उभे केलेल्या २७ उमेदवारांनी उद्धव ठाकरे शिवसेनेची आणि काँग्रेसची मते खाल्ली. त्यातून यशाचा मार्ग मोकळा झाला.

रत्नागिरीत पाचपैकी शिंदेंच्या शिवसेनेने तीन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा राखली आहे. सिंधुदुर्गात तीनपैकी भाजपने एक आणि शिंदे यांच्या शिवसेनेने दोन जागा जिंकल्या आहेत. 

सिंधुदुर्गमध्ये कणकवलीची एक जागा नितेश राणे यांनी भाजपच्या चिन्हावर तर नीलेश राणे यांनी शिंदेसेनेच्या चिन्हावर जरी निवडणूक जिंकली असली, तरी कणकवली, कुडाळ राणेंचेच आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे. 

निवडणुकीच्या काही काळ आधी ठाकरे गटात आलेल्या राजन तेली यांना मात्र सावंतवाडीमधून यश मिळाले नाही. त्यांचा शिंदेसेनेचे दीपक केसरकर यांनी पराभव केला आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मुंबईसाठी नेमलेले निरीक्षक मुंबईत फारसे फिरलेच नाहीत. 

भाजपने ५० लोकांपासून ते ५ हजारांपर्यंतच्या असंख्य मीटिंग मुंबई परिसरात घेतल्या. ज्याची खबर काँग्रेस आणि उद्धव सेनेला लागलीच नाही.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मुंबईउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसभाजपा