Join us

गोपाळ शेट्टींना विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने समर्थकांमध्ये नाराजीची लाट

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 28, 2024 19:30 IST

गोपाळ शेट्टी ३ वेळा नगरसेवक,२ वेळा आमदार,२ वेळा  लाखोंचे मताधिक्याने  निवडून येणारे खासदार होते.

मुंबई- आज भाजपाच्या यादीत बोरिवली मतदारसंघाचा उमेदवार घोषित करण्यात आला. त्यात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना तिकीट मिळाले पाहिजे अशी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यांना तिकीट मिळणार अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र आज बोरीवलीतून गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व शेट्टी समर्थक संतप्त झाले.  त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून पोयसर जिमखान्याबाहेर जमून घोषणाबाजी करत पक्षाने सदर निर्णय बदलून शेट्टी यांना तिकीट देण्याची जोरदार मागणी केली.

गोपाळ शेट्टी ३ वेळा नगरसेवक,२ वेळा आमदार,२ वेळा  लाखोंचे मताधिक्याने  निवडून येणारे खासदार होते.त्यांना नंतरही खासदारकी नाकारण्यात आली.त्यावेळी शेट्टी यांनी नमते घेत पक्षाचे नवीन उमेदवार पियूष गोयल यांना निवडून देण्यासाठी रक्ताचे पाणी केले. २०२४ विधान सभेचे तिकिट देऊन त्यांचे पुनर्वसन करण्या ऐवजी बोरीवलीत पुन्हा एकदा बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे कार्यकर्ते वा जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. पोयसर जिमखान्या बाहेर गोपाळ शेट्टी यांना पक्षाने तिकिट द्यावे यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बोरीवली जनतेला गृहीत धरू नये. संघर्ष अटळ आहे. आता त्यांना जो पर्यंत तिकीट देत नाही तो पर्यंत संघर्ष सुरूच रहाणार आहे. पक्षाने आपला चुकीचा निर्णय बदलावा हीच उत्तर मुंबईतील भाजप कार्यकर्ते मागणी करत आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४बोरिवलीमुंबई विधानसभा निवडणूकगोपाळ शेट्टीभाजपा