Samadhan Sarvankar : राज ठाकरेंच्या न झालेल्या भेटीमागची Inside Story; सरवणकर 'शिवतीर्थ'वर गेले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 15:38 IST2024-11-04T15:36:51+5:302024-11-04T15:38:12+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Sada Sarvankar Samadhan Sarvankar And Raj Thackeray : सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.

Samadhan Sarvankar : राज ठाकरेंच्या न झालेल्या भेटीमागची Inside Story; सरवणकर 'शिवतीर्थ'वर गेले, अन्...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून महायुतीमधील घटक पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान आज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. पण राज ठाकरे यांनी ही भेट नाकारली आणि निरोप पाठवला. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
"आम्ही राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो पण राजसाहेबांनी भेट घेणं टाळलं. मुख्यमंत्री साहेबांनी समजूतदारपणाने जी भुमिका घेतली होती त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. वेळ घेण्यासाठी गेलो होतो. आम्ही दोनदा निरोप पाठवला होता पण त्यांनी भेट घेणं टाळलं, त्यामुळे भेट होऊ शकली नाही. नितीन सरदेसाई यांनी मी काही निर्णय घेऊ शकत नाही असं म्हटलं."
"राजसाहेब आज घरी होते. त्यामुळे म्हटलं आज भेटणं होईल. दिलखुलास माणूस, नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यावर ते भेटतील असं वाटत होतं पण ते आज वेगळ्या मनस्थितीत होते, ते भेटण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी आदर आजही आहे. ही लढाई आता जनतेची झाली आहे, मतदारराजाची झाली आहे. मतदारराजाला जे वाटेल ते तो आता करेल. काय वाटेल ते करा मला भेटायची इच्छा नाही असा निरोप आला."
"भेटतील अशी एक अपेक्षा होती म्हणून आम्ही आज इथे आलो होतो. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. अनेकवेळा संबंधातून खूप गोष्टी नीट होतात. भेटण्याची गरज असते. प्रत्येक कार्यकर्ता हा मेहनतीने मोठा झालेला असतो" असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं आहे. सदा सरवणकर यांनी काही वेळापूर्वी मनसेसमोर महत्त्वाची एक अट ठेवली आहे. मुंबईत महायुतीच्या विरोधातील सर्व उमेदवार मनसे मागे घेणार असेल तर आपण अडून राहणार नसल्याचे सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. मात्र आता राज ठाकरे यांच्यासोबत भेट न झाल्याने त्यांनी माघार घेतली नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.