Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इथे लुटणारे होतेच त्यात अजून..."; राहुल गांधींच्या तिजोरीवरुन CM शिदेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 19:21 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी दाखवलेल्या तिजोरीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचाराची वेळ संपल्यानंतर आता मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है या घोषणेची खिल्ली उडवली होती. एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक हैं तो सेफ हैं  असं लिहीलेली तिजोरी आणून त्यातून काही फोटो बाहेर काढले. या सगळ्या प्रकारानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला. राहुल गांधींनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कटेंगे तो बटेंगे  आणि एक है तो सेफ है या घोषणांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये एक तिजोरी आणली. या तिजोरीवर ‘एक है तो सेफ है’ हे वाक्य लिहिलं होतं. या तिजोरीतून राहुल गांधींनी दोन बॅनर काढले.  एका बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांचा फोटो होते. दुसऱ्या बॅनरवर धारावीचा नकाशा होता.

या तिजोरीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. "राहुल गांधींनी आज एक मोठी तिजोरी आणली होती. आम्हाला वाटलं महाराष्ट्राला काहीतरी देण्यासाठी आणली असेल. पण त्यांनी तिजोरीमधून अदाणींचा फोटो बाहेर काढला. महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठी आश्वासनं दिली आहेत. राहुल गांधी महाराष्ट्राची तिजोरी लुटण्यासाठी आले आहेत. आधीच इथे लुटणारे डाकू होतेच त्यात आता नवीन भरती झाले. राहुल गांधींकडून आम्हाला ही आशा नव्हती. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली आणि त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

"धारावीतल्या दोन लाख लोकांना घर मिळणार आहे. एवढ्या सगळ्या लोकांचे जीवनमान बदलणार आहे. दोन लाख लोक कचऱ्यात राहतात. त्यांची अवस्था खूप खराब आहे. त्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर राहुल गांधी यांनी याची योग्य माहिती घ्यायला हवी. आधी तर सेटलमेंट झाली होती पण सरकार कोसळल्यानंतर विरोध सुरु झाला. त्यामुळेच धारावीसाठी सगळ्यांनी प्राथमिकता द्यायला हवी. धारावीकरांनी राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवा, तुमचा फायदा कशात आहे ते पाहा. आम्हाला कोणतेही श्रेय घ्यायचे नाही. एक घर एक कोटींचे असणार आहे," असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबईएकनाथ शिंदेराहुल गांधी