संजय शिरसाटांबद्दल माधुरी मिसाळांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कॅबिनेट अन् राज्यमंत्री अधिकारांवरून भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:14 IST2025-07-27T10:13:08+5:302025-07-27T10:14:28+5:30
शिंदेसेनेचे शिरसाट आणि भाजपच्या मिसाळ यांच्यात सध्या वाद सुरू आहे.

संजय शिरसाटांबद्दल माधुरी मिसाळांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कॅबिनेट अन् राज्यमंत्री अधिकारांवरून भिडले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याला कोणतेही अधिकार दिलेले नाहीत, विभागाच्या बैठकाही ते आपल्याला घेऊ देत नाहीत अशी तक्रार या विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
शिंदेसेनेचे शिरसाट आणि भाजपच्या मिसाळ यांच्यात सध्या वाद सुरू आहे. विभागाची एखादी बैठक बोलावताना अधिकाऱ्यांना त्यासाठी सूचना करावयाची असेल तर माझी पूर्वपरवानगी आवश्यक आहे, असे पत्र शिरसाट यांनी मिसाळ यांना पाठविले होते. ‘माझ्याकडील विषयांशी संबंधित बैठक आपणास घ्यायची असेल तर ही बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहील, असेही शिरसाट यांनी पत्रात म्हटले होते.
मिसाळ यांनी त्याला सडेतोड उत्तर देणारे पत्र धाडले. राज्यमंत्री म्हणून बैठक घेण्याचे अधिकार मला आहेत. आपल्या अधिकारात असलेल्या विषयांवर मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आपण व्यक्त केलेले मत मी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे, असे उत्तरात म्हटले आहे.
शिरसाट यांनी धोरणांची पायमल्ली चालविली
संजय शिरसाट यांनी आपल्याला फारसे अधिकार दिलेले नाहीत. बैठकाही ते आपल्याला घेऊ देत नाहीत. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या अखत्यारीत विभागाचे कोणते विषय असावेत याबाबत सरकारचे जे धोरण आहे त्याची शिरसाट यांनी पायमल्ली चालविली असल्याची तक्रार मिसाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, की सरकारमध्ये विसंवाद असल्याचे हे उदाहरण आहे. एकाच खात्याच्या दोन मंत्र्यांमध्ये अशा पद्धतीने वाद सुरू आहे. विभागाच्या कामकाजाला त्यामुळे नक्कीच फटका बसतो. विषय अधिकाराचा आहे की आणखी काही तेही पाहिले पाहिजे.
शिरसाट काय म्हणाले?
शिरसाट यांनी पत्रकारांना सांगितले, की काही विषय केवळ कॅबिनेट मंत्र्यांच्या, तर काही विषय हे राज्यमंत्र्यांच्या अधिकारात येतात. तुम्हाला काही विषयावर बैठक घ्यायची असेल तर तुम्ही मला पूर्वकल्पना द्या, जेणेकरून निर्णय घेणे सोपे जाईल, एवढेच माझे म्हणणे होते.