Join us

मदन शर्मा यांना 'Y प्लस' सेक्युरिटी देण्यासाठी प्रयत्न करणार, आठवलेंनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 16:15 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे

ठळक मुद्देआता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. 

मुंबई – निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारल्यानंतर आता या मुद्द्यावरुन भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्याचं ठरवलं आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धोरण असल्याचं शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रक काढून म्हटलं होतं. त्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी टोला लगावला होता. तर, आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांनी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर त्यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. याप्रकरणी, आमदार आशिष शेलार यांनीही ट्विट करुन म्हटलं आहे की, वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे,  संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण, “इथे कायद्याचे राज्य” आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे? असा टोला त्यांनी शिवसेनाला लगावला आहे.

भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी मदन शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच, शर्मा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याची मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर केला आहे.  

कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी राजीनामा द्या

नौदलाच्या निवृत्त अधिकारी मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली होती.

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले.

आठवले-कंगना भेट

मुंबईतील ऑफिस तोडल्याप्रकरणी आणि मुंबईत सुरक्षा दिल्यानंतर आरपीआयचे नेते आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनी आज कंगना राणौतची तिच्या घरी भेट घेतली. यावेळी कंगनाने आपल्याला राजकारणात रुची नसल्याचे सांगितल्याचे आठवले म्हणाले. राजकारणात रुची नसली तरीही समाज एकत्र राहण्यामध्ये असल्याचे कंगनाने आठवलेंना सांगितले. कंगना तिच्या आगामी चित्रपटात एका दलित मुलीची भूमिका साकारत आहे. जातीपातीची सिस्टिम नष्ट व्हावी असे या चित्रपटाचे कथानक आहे, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :रामदास आठवलेमुंबईशिवसेनागुन्हेगारी