हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढले, मुंबईत कोणत्या ठिकाणी कसा आहे हवामानाचा दर्जा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:19 IST2026-03-04T17:18:12+5:302026-03-04T17:19:20+5:30
वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे.

हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढले, मुंबईत कोणत्या ठिकाणी कसा आहे हवामानाचा दर्जा?
मुंबई :
वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्करोग तपासणी मोहिमेनुसार, मुंबईतील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुमारे ५७ टक्के रुग्णांमध्ये वायू प्रदूषण हे प्रमुख कारण असल्याचे आढळले आहे. धूर, धुलिकण आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे हवेत घातक घटकांचे प्रमाण वाढले आहे.
शहरात वाढणारी वाहने, सुरू असलेली बांधकामे आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यास फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल होऊन कर्करोगाचा धोका वाढतो असे श्वसनविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महत्त्वाची माहिती:
कर्करोगासाठी कारणीभूत: डिझेल इंजिनचा धूर, औद्योगिक रसायने, तंबाखू धूर.
कर्करोगाची लक्षणे: तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, रक्तासह खोकला, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, वजन घटणे, थकवा.
दुष्परिणाम काय? दमा आणि ब्रॉन्कायटिस, श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला, हृदयरोगाचा धोका, फुफ्फुसांचा कर्करोग.
काय काळजी घ्याल? मास्कचा वापर, व्यायाम टाळणे, घरात एअर प्युरिफायरचा वापर, नियमित आरोग्य तपासणी, झाडे लावणे आणि जपणे.
तज्ज्ञांचे मत:
"प्रदूषण हा 'सायलंट किलर' ठरत आहे. धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने दुर्लक्ष करू नये. प्रदूषणामुळे 'प्राणवायू'च जीवघेणा ठरत असल्याची भीती व्यक्त होत असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे."
— डॉ. रोहित हेगडे, श्वसनविकार तज्ज्ञ, जेजे हॉस्पिटल
मुंबईतील विविध भागांतील हवेचा दर्जा (आकडेवारी):
भाग >> निर्देशांक
मालाड (प.) >> १३०
बोरीवली (पूर्व) >> १०५
विमानतळ टी-२ >> १०८
कांदिवली (पूर्व) >> १६४
बीकेसी >> १२२
मुलुंड (प.) >> १५४
पवई >> १५८
भांडुप (प.) >> ९९
घाटकोपर >> ११०
देवनार >> १४५
वरळी >> ९५
चेंबूर >> १२६
कुलाबा >> ६४
सायन >> ९०
भायखळा >> ७८
शिवडी >> ११९
माझगाव>> ११०