Lower Parel Bridge Closed : लोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 11:36 IST2018-07-24T09:39:14+5:302018-07-24T11:36:43+5:30
लोअर परळ स्थानकाबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Lower Parel Bridge Closed : लोअर परळ रेल्वे पूल बंद असल्याने प्रवाशांची कोंडी
मुंबई - लोअर परळचा रेल्वे पूल दुरुस्तीसाठी बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र पूल परिसरात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. लोअर परळ परिसरात अनेक उद्योग- धंदे असून कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे रोजगारासाठी प्रवाशांचे लोंढे सकाळी ९ ते १० च्या सुमारास येत असतात. मात्र हा पूल बंद असल्याची अनेक प्रवाशांना कल्पना नसल्याने परिसरात गर्दी झाली आहे. पूल बंद झाल्याने ईस्टर्न बेकरीकडे उतरणाऱ्या जिन्यावर चेंगराचेंगरीची भीती आहे. खबरदारी म्हणून पोलिसांसह रेल्वे प्रशासन आणि पालिकेने उपाययोजना आखण्याची गरज प्रवाशांकडून होत आहे.
मुंबई आयआयटी अभियंता, रेल्वे आणि मनपा अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत लोअर परळ रेल्वे पुलावरून जाणारा उड्डाणपूल तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचीच दखल वाहतूक मार्गात विविध बदल सुचविले आहे. मात्र वाहतूकीला पर्यायी मार्ग सुचविले असले तरी पादचाऱ्यांच्या मार्गाबाबत अडचण कायम दिसत आहे. लोअर परळ पश्चिमेकडून येणारे सर्वसामान्य नागरिक आणि रेल्वे प्रवासी यांची संख्या पाहता, पूर्वेकडील जिन्यांची जागा अपूरी पडण्याची शक्यता आहे.