लोअर परळ पूल पाडणारच! पश्चिम रेल्वेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:48 AM2018-08-16T05:48:29+5:302018-08-16T05:49:20+5:30

धोकादायक असलेल्या लोअर परळ (डिलाइल पूल) पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होणार असून, पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती या वेळी करण्यात येईल.

Lower lower Parel bridge News | लोअर परळ पूल पाडणारच! पश्चिम रेल्वेचा निर्धार

लोअर परळ पूल पाडणारच! पश्चिम रेल्वेचा निर्धार

Next

मुंबई - धोकादायक असलेल्या लोअर परळ (डिलाइल पूल) पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया गुरुवारी पूर्ण होणार असून, पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती या वेळी करण्यात येईल. कंत्राटदार नेमल्यानंतर पुलाच्या पाडकाम प्रक्रियेला सुरुवात होईल. हा पूल प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याने काहीही झाले तरी तो पाडणारच, असा निर्धारच पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.
लोअर परळ पुलाच्या पाडकामाला अंदाजे ५ ते ६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पश्चिम रेल्वे पाडकामाच्या निधीसाठी महापालिकेच्या निधीची वाट पाहणार नाही. पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती झाल्यानंतर, संबंधित विभागाकडून ब्लॉकची मागणी करण्यात येईल. कंत्राटदारानुसार, ब्लॉकच्या वेळा निश्चित करण्यात येतील.
तत्पूर्वी पूल पाडकामाचा आराखडा रेल्वे सुरक्षा आयोगाच्या (सीआरएस) मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. सीआरएस मंजुरीनंतर त्वरित पुलाच्या पाडकाम प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
आयआयटीच्या नेतृत्वाखाली रेल्वे आणि महापालिका यांच्या संयुक्त पाहणीत धोकादायक लोअर परळ पूल २४ जुलैला सकाळी ६ वाजल्यापासून बंद करण्यात आला होता. सद्यस्थितीत पूल वाहतुकीसाठी पूर्णत: आणि पादचारी प्रवाशांसाठी अंशत: बंद आहे. पूल असुरक्षित असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुलाचे पाडकाम करणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मुंबई उपनगरीय पुलांची माहिती मागविली होती. माहिती अधिकारानुसार, मुंबई उपनगरातील ४४ रेल्वेवरील पुलांना ६० वर्षे पूर्ण झाली असून, अद्यापही ते वापरात आहेत. यात १८ आरओबी (आरओबी) २६ पादचारी (एफओबी) तर, १५ आरओबीची आणि ४ पादचारी पुलांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
या पुलांचे कामही हाती घेणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

उरले केवळ ४ दिवस
पुलाचे पाडकाम करण्याआधी केबल्स, तारा आणि थांबा तातडीने हलविण्याची गरज आहे. यामुळे संबंधित सर्व यंत्रणांना जाहीर सूचना देत, २० आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदत पूर्ण होण्यास केवळ चार दिवस उरले आहेत. मुदतीनंतर पुढील काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन या सुविधा हटविणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

सव्वा दोन कोटींचा खर्च
अंधेरी गोखले पुलाच्या कोसळलेल्या पादचारी भागाच्या दुरुस्तीसाठीही निविदा प्रक्रिया सुरूआहे. अंधेरी गोखले पुलाच्या दुरुस्तीसाठी २ कोटी २२ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली.

Web Title: Lower lower Parel bridge News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.