धारावी, बीकेसी, कलिनातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पुढच्या आठवड्यात ८७ तास जलवाहिनीचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:21 IST2025-12-20T12:20:46+5:302025-12-20T12:21:37+5:30
क्रॉस कनेक्शनचे महापालिकेसमोर आव्हान

धारावी, बीकेसी, कलिनातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पुढच्या आठवड्यात ८७ तास जलवाहिनीचे काम
मुंबई : मुंबई महापालिकेकडून 'जी उत्तर', 'के पूर्व' आणि एच पूर्व विभागांतील २,४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या छेद-जोडणीचे (क्रॉस कनेक्शन) काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम सोमवार, २२ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून शुक्रवार, २६ डिसेंबरला दुपारी १ वाजेपर्यंत (एकूण ८७तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात या विभागांतील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही बदल होणार आहे.
मेट्रो मार्गिका '७ अ' प्रकल्पासाठी अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्यात येणार असून, हे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. त्यामुळे धारावी परिसर, विमानतळ परिसरासह विविध वसाहती, वांद्रे-कुर्ला संकुल, कलिना, खेरवाडी, वांद्रे (पूर्व) आदी भागांत ठरावीक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
२,४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला जोडणीचे काम हाती घेतल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
डिसेंबर २२ तारखेपासून पाणीकपात, २६ डिसेंबरला दुपारी १ वाजेपर्यंत जलवाहिनीचे काम - 'जी उत्तर' विभाग, 'के पूर्व' विभाग, 'एच पूर्व' विभाग
पुरवठ्याच्या वेळेत बदल
काही भागांत सकाळी, काही भागांत दुपारी व सायंकाळी, तर काही भागांत मध्यरात्रीनंतरच्या वेळेत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या विभागांतील नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
कोणत्या परिसरात होणार पाण्याची टंचाई?
१. धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, जस्मिन मील मार्ग, गांधी मार्ग, गणेश मंदिर मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर
२. कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी अॅण्ड टी वसाहत, कोलडोंगरी, जुनी पोलिस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरापाडा
३. मोतीलाल नगर, प्रभात वसाहत, 3 टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी, हंसभुग्रा, सीएसटी मार्ग, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, ३ बंगला, शांतिलाल कंपाउंड, पटेल कंपाउंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, वांद्रे वसाहत