उत्पन्न कमी खर्च अधिक : एसटीच्या १४ हजार फेऱ्यामधून ९३ हजार प्रवाशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 06:44 PM2020-05-27T18:44:27+5:302020-05-27T18:44:44+5:30

राज्यातील जिल्हातंर्गत एसटीच्या सेवेत एका फेरीत सरासरी 5 प्रवासी  

Low income, high cost: 93,000 passengers travel out of 14,000 round trips of ST | उत्पन्न कमी खर्च अधिक : एसटीच्या १४ हजार फेऱ्यामधून ९३ हजार प्रवाशांचा प्रवास

उत्पन्न कमी खर्च अधिक : एसटीच्या १४ हजार फेऱ्यामधून ९३ हजार प्रवाशांचा प्रवास

Next

 

मुंबई : एसटी महामंडळाकडून राज्यातील नॉन रेड झोनमध्ये जिल्ह्यांच्या अंतर्गत एसटीची सेवा २२ मे पासून सुरु केली आहे. एसटीच्या निवडक मार्गावर फेऱ्या सुरु झाल्या असल्या तरी, प्रत्येक फेरीमधून सरासरी फक्त ५ प्रवाशांचा प्रवास होत आहे. यामध्ये प्रत्येक एसटी डेपोमध्ये उत्पन्नापेक्षा डिझेल आणि नियोजनाचा खर्च अधिक झाल्याचे दिसून येत आहे. दररोज २२ कोटींचे उत्पन्न कमविणारे एसटी महामंडळ आता दररोज ४ ते ६ लाखांचे उत्पन्न मिळवित आहे.

मुंबई, पालघर, ठाणे येथील अत्यावश्यक सेवा वगळता राज्यभरातील एसटी सेवा दोन महिने बंद होती. दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा एसटी महामंडळाने एसटीची जिल्ह्यांतर्गंत सेवा सुरू करण्याच निर्णय घेतला. २२ मे या पहिल्याच दिवशी ४५७ गाड्यांच्या मार्फेत निवडक मार्गांवर २ हजार ७ फेऱ्या धावल्या. यातून ११ हजार १५१ प्रवाशांनी प्रवास केला. तर, २६ मेपर्यंत ३ हजार ११८ बस चालविण्यात आल्या. या बसचे निवडक मार्गावर १४ हजार २८२ फेऱ्या धावल्या. यातून ९३ हजार ३९३ प्रवाशांनी प्रवास केला. २२ मे ते २६ मे पर्यंत एसटी महामंडळाला अंदाजे २२ ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एसटी महामंडळाचा सहा हजार कोटी पेक्षा जास्त संचित तोटा वाढला आहे. प्रवाशांना वेळेवर आणि दर्जेदार सुविधा देण्यासाठी नवीन लाल गाड्याची कमतरता, बसचा वाढलेला देखभालीचा खर्च, इंधन खर्च आणि तिकिट दरवाढीत मर्यादा, सवलतीच्या दरातील तिकिट, खासगी वाहतूक  अशा कारणामुळे एसटीचा तोटा वाढला आहे.  

लालपरी वाढण्याऐवजी महामंडळाने शिवशाही वाढविण्यावर भर दिला. मात्र प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरविली. परिणामी, एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत गेली. प्रवाशांची संख्या घटल्याने याचा  परिणाम एसटीच्या आर्थिक तोट्यात झाला. एसटीचे प्रवासी वाढविण्यासाठी एसटी विस्तार करणे आवश्यक होते. मात्र एसटीच्या प्रशासनाने अनियोजित कारभारामुळे एसटीचा विस्तार खुंटला. एसटी मार्गात खासगी  वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीचा प्रवासी खासगी  वाहनांकडे जाऊ लागला आहे. यासह इंधनावरील वाढलेला खर्च आणि तिकिट दरवाढीत मर्यादा आणल्यामुळे एसटीला तोट्याला सामोरे जावे लागते.  

अशातच मागील दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एसटी सेवा बंद आहे. त्यामूळे निव्वळ प्रवासी उत्पन्नावर अवलंबून असलेल्या एसटी महामंडळाची तिजोरी तळाला गेली आहे.  

-------------------------------

दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा एसटी महामंडळाने एसटीची जिल्ह्यांतर्गंत सेवा सुरू करण्याच निर्णय घेतला खरा, मात्र प्रवासीच मिळत नसल्याने, अनेक जिल्ह्यांमध्ये रिकाम्या बस फिरताना दिसून येत आहे. तर, अनेक बसमध्ये एक ते दोन प्रवाशांसाठी धावतांना दिसून येत आहे.त्यामुळे डिझेल आणि त्याच्या नियोजनाचा खर्च एसटीला उचलावा लागत असताना. मात्र उत्पन्न अत्यल्प होत आहे. 

  ------------------------------- 

  • प्रवाशी कमी असण्याची कारणे
  • कोरोनाच्या भीतीमुळे नॉन रेड झोनमधील अनेक लोक जण घराबाहेर पडलेले नाही. 
  • मे महिन्यातील लग्नकार्य,यात्रा -जत्रा या सर्वांच्यावर बंदी आहे. त्यामुळे तो प्रवासी वर्ग कमी झाला आहे.
  • सध्या ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या मशागतीचे काम आहे. ग्रामीण भागातील लोक या कामामध्ये गुंतली आहेत.

-----------------------------------

जरी प्रवासी संख्या कमी असली तरी एसटीची चाके फिरणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली एसटी, जर प्रवासी सेवेत उपलब्ध असेल, तर भविष्यात ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी त्याची मदत होईल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

------------------------------------

 

  प्रदेश -            फेऱ्या                प्रवासी संख्या
--------------------------------------------------------
पुणे प्रदेश        २ हजार १३८           ९ हजार २४४
-------------------------------------------------------------------
नाशिक प्रदेश     १ हजार ६२२      ६ हजार ६१५ 
----------------------------------------------------------
नागपूर प्रदेश     २ हजार ६०२     १७ हजार ८०५
--------------------------------------------------------
अमरावती प्रदेश  १ हजार ८६१    १५ हजार ८४० 
----------------------------------------------------
मुंबई प्रदेश           १ हजार ७६५  ११ हजार १६८   
--------------------------------------------------------
औरंगाबाद प्रदेश   ४ हजार २९४    ३२ हजार ७२१   
------------------------------------------------
एकूण =           १४ हजार २८२    ९३ हजार ३९३
---------------------------------------  

 

Web Title: Low income, high cost: 93,000 passengers travel out of 14,000 round trips of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.