शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 06:10 IST2024-12-25T06:09:40+5:302024-12-25T06:10:15+5:30

सायबर भामट्याचा शोध सुरू

lost six and a half crores in the frenzy of share trading | शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे

शेअर ट्रेडिंगच्या नादात त्याने गमावले पावणेसहा कोटी; २१ दिवसांत बँक अधिकाऱ्याचे खाते रिकामे

मुंबई : एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या जीवन विमा विभागातील एक अधिकारी सायबर भामट्याच्या शेअर ट्रेडिंग जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. अवघ्या २१ दिवसांत त्यांची पावणेसहा कोटींनी फसवणूक झाली आहे. सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

अंधेरी पूर्वेचे ५३ वर्षीय तक्रारदार यांना १२ सप्टेंबर रोजी अमन मलिक नावाच्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर  संदेश पाठवला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे का? याबाबत विचारणा केली. त्यांनी ॲक्सिसच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगताच, आपण ॲक्सिस सिक्युरिटीमधूनच बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदार जाळ्यात फसत गेले. पुढे त्याने पाठवलेल्या लिंकद्वारे तक्रारदार एका व्हॉट्सॲप  ग्रुपमध्ये सहभागी झाले. 

तो ग्रुप ॲक्सिसकडून चालवला जात असल्याचे भासवून विश्वास संपादन करण्यात आला.  त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन करणारे मेसेज येण्यास सुरुवात झाली. ग्रुपमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा होत असल्याचे स्क्रीनशॉट येत हाेते. त्यामुळे तक्रारदाराचा आणखी विश्वास बसला.

अशी झाली फसवणूक

मलिकने दिलेल्या लिंकवरून तक्रारदाराने एक ॲप डाउनलोड केला. त्यामध्ये त्यांचे शेअर ट्रेडिंग खाते नोंद झाल्याचे दिसले. त्यांनी सुरुवातीला १८ ऑक्टोबर रोजी ५ लाख रुपये गुंतवले. त्यामध्ये त्यांना चांगला नफा झाल्याचे दिसताच ते गुंतवणूक करत गेले. 

१८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान त्यांनी १८ व्यवहारात ५ कोटी ७० लाख रुपये गुंतविले. ११ नोव्हेंबर रोजी गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच, त्यांना आणखीन पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी एक्सिस सिक्युरिटीजकडे चौकशी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे समजताच त्यांना धक्काच बसला.

अखेर पोलिसांत धाव

त्यांनी तत्काळ १९३० वर कॉल करून फसवणुकीबाबत सांगितले. अखेर याप्रकरणी २१ तारखेला सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: lost six and a half crores in the frenzy of share trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.