Join us
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्राला वेगळ्या चष्म्यातून पाहा, प्रगती दिसेल; आम्ही २४ तास जनसेवेत”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:56 IST

Deputy CM Eknath Shinde In Vidhan Parishad News: पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली.

Deputy CM Eknath Shinde In Vidhan Parishad News: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपलांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे प्रमुख ध्येय आहे.  विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. 

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ३९ टक्के

राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी सांगताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे केवळ देशातीलच नव्हे तर जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचे राज्य बनले आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात नंबर वन असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३.५ टक्के आहे. २०२४-२५ या वर्षात महाराष्ट्राला १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ३९ टक्के आहे. महाराष्ट्राला वेगळ्या चष्म्यातून पाहा, प्रगती दिसेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

८२ टक्के करार अंमलबजावणीच्या टप्प्यावर 

याआर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातही ९१ हजार ३३७ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून परकीय गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमध्ये १८ देशांतील कंपन्यांशी सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक सामंजस्य करार झाले असून त्यापैकी ८२ टक्के करार अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. या गुंतवणुकीतून क्वांटम कम्प्युटिंग, एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत मोठी कामे होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती

पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. मुंबईत आशियातील सर्वात मोठे 'जागतिक क्षमता केंद्र' उभारले जाणार असून त्यातून ४५ हजार रोजगार निर्माण होतील. पालघरमधील वाढवण बंदर हे जेएनपीटीच्या तिप्पट क्षमतेचे असून तो एक 'गेमचेंजर' प्रोजेक्ट ठरेल, ज्यामुळे ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्माण होतील. याशिवाय समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांमुळे राज्याची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. केवळ मुंबई-पुण्यापुरता विकास मर्यादित न ठेवता औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींची, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटींची गुंतवणूक येत आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी असून ते भविष्यातील ईव्ही उत्पादनाचे मोठे केंद्र असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

२०२६ हे वर्ष 'भरती वर्ष' म्हणून राबवले जाणार 

राज्यातील तरुणांच्या रोजगाराबाबत मोठी घोषणा करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, २०२६ हे वर्ष 'भरती वर्ष' म्हणून राबवले जाणार आहे. यापूर्वी ७५ हजार रिक्तपदांची मोहीम राबवून आतापर्यंत १ लाख ५३ हजार पदांपैकी ८५ हजार ३६३ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण केली जात असून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, प्रशासनात आमूलाग्र बदल करण्यासाठी 'जीपीआर २.०' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून त्याचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असून महाराष्ट्राच्या प्रगतीची गाडी सुसाट सुटली आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आम्ही केले असून विकासाची यात्रा ता थांबणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : See Maharashtra differently, you'll see progress: Eknath Shinde

Web Summary : Maharashtra is progressing rapidly with industrial investment leading the nation. Numerous projects are underway, promising job creation and significant foreign investment. The government aims for comprehensive development, focusing on job creation and transparent governance, with 2026 declared the 'Recruitment Year.'
टॅग्स :एकनाथ शिंदेविधान परिषदविधान भवनराजकारणराज्य सरकार