लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 06:13 IST2025-07-04T06:12:38+5:302025-07-04T06:13:05+5:30
या गुन्ह्यात तिला मदत करणाऱ्या लंडनमधील महिला डॉक्टर विरूद्ध एलओसी जारी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई : एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला कथित प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या दादरमधील नामांकित शाळेतील ४० वर्षीय माजी शिक्षिकेच्या सायकॉलॉजिकल टेस्टसह विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. पीडित मुलाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात तिला मदत करणाऱ्या लंडनमधील महिला डॉक्टर विरूद्ध एलओसी जारी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
शिक्षिकेला गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यात मदत करणाऱ्या तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या अटकेसाठीही पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ती गेल्या दिवाळीपासून लंडनमध्ये राहण्यास आहे. लैंगिक शोषणामुळे तणावात गेलेल्या मुलाला समुपदेशन करून, आरोपीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मन वळविणे आणि तणावमुक्त करण्यासाठी गोळ्या दिल्याचा या मैत्रिणीवर आरोप आहे. ही महिला डॉक्टर मुंबईमध्ये आली असताना पीडित मुलाला भेटली, तसेच फोनवरून संपर्कात होती, अशी माहितीही चौकशीत समोर आली आहे. पोलिस या डॉक्टर महिलेशी ई-मेल आणि दुतावासाच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिक्षिकेने २४ जानेवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कीर्ती कॉलेज ते सारस्वत कॉलनीसमोरील फुटपाथनजीक कारमध्ये, तसेच जुहूचे जेडब्ल्यू मॅरियट, विलेपार्ले येथील प्रेसिडेंट व ललित या तीन हॉटेलमध्ये मुलावर लैगिक अत्याचार केले.
मुलालाही दारू पाजून लैंगिक शोषण केल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे. पोलिस आता संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडे चौकशी करत आहेत.
...म्हणून दिला राजीनामा
पोलिसांनी पडताळणीसाठी आरोपी शिक्षिकेचा मोबाइल फोन ताब्यात घेतला आहे. ही शिक्षिका कोरोना काळात शाळेत नोकरीला लागली होती. वेतन कमी असल्याने ही नोकरी सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर ती कंटेंट रायटर म्हणून काम करत असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी शाळेकडे मुलाच्या माहितीसह शिक्षिकेची माहितीही मागवली आहे.
माझे त्याच्यावर प्रेम आहे!
शिक्षिकेने ‘माझे अजूनही त्याच्यावर प्रेम आहे’ असे पोलिस चौकशीत म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये बारावीच्या परीक्षेमुळे मुलासोबत शिक्षिकेचे नातेसंबंध तुटले. त्याने शिक्षिकेला भेटणे टाळले. मोबाइलवर ब्लॉक केले. चार महिने वेगळे राहिल्यानंतर शिक्षिकेने तिच्या मोलकरणीला दोन वेळा पीडित मुलाच्या घरी पाठवले. तिने आई बनण्यापूर्वी वैद्यकीय मदत घेतल्याचे उघड झाल्याने पोलिस तिच्या पतीचीही चौकशी करत आहेत.